मुंबई : मॅरेथॉन शर्यती गेली अनेक वर्षे आयोजित होत आहेत. अलीकडे मॅरेथॉन शर्यतींकडे कल वाढलेला दिसून येत आहे.
केवळ फिटनेस इतकेच लक्ष्य न ठेवता आता त्यासोबतीने स्तनांचा कर्करोग, महिला सबलीरकरण यासारख्या अनेक उद्दिष्टांसाठी निधी संकलन करण्यासाठी मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं.
उत्साहाच्या भरात, हौसेखातर आणि प्रशिक्षणाशिवाय धावणं त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच एसआरव्ही हॉस्पिटल, मुंबईचे गुडघे व हिप अर्थोप्लास्टी डॉ. मनन गुजराथी यांचा हा खास सल्ला नक्की लक्षात ठेवा.
तुमच्या फॅमिली डॉक्टर करून मूलभूत वैद्यकीय चाचणी करून घ्या आणि त्यांची अनुमती घ्या. जर गुडघ्यांना गंभीर स्वरूपाचा आर्थरायटिस असेल आणि अनियंत्रित रक्तदाब असेल तर धावण्यासारखी हाय इम्पॅक्ट अॅक्टिव्हिटी हितावह नाही.
योग्य शूज आणि सॉक्स असतील तर फोड येत नाहीत. कॉटनचे (सुती) टी-शर्ट घामाने भिजतात आणि चिकटतात. त्यामुळे नायलॉनचे टीशर्ट वापरा. जर तुम्ही उन्हातून धावणार असाल तर तुमच्या शरीराला पूर्ण झाकले जातील असे कपडे निवडा. त्वचेवर सनब्लॉक क्रीम लावूनच बाहेर पडा.
मॅरेथॉनच्या ९ ते १२ आठवड्यांआधीपासून प्रशिक्षण सुरू करा. सुरुवातील कमी वेगात आणि कमी अंतर धावा, जेणेकरून शरीरातील स्नायूंचा लवचिकपणा आणि स्टॅमिना वाढू शकेल. जसजसा तुमचा स्टॅमिना वाढेल तसतसे दररोज अंतर आणि वेग १० टक्क्यांनी वाढवा.
सुरुवात करण्याआधी नेहमी वॉर्म अप करा. प्रशिक्षण सत्राच्या शेवटी स्ट्रेचिंग करा. आठवड्यातून किमान तीन-चार वेळा धावा. केवळ वीकएण्डपुरते मर्यादित राहू नका.
हायड्रेशन पातळी ठेवा, मुबलक पाणी प्यावे. ज्या पेयातून थकवा आणि पायाला गोळे येण्याला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने कॅलरी, द्रव आणि इलेक्ट्रोबाइट्स मिळतील, असे पेय निवडा.
जर एखाद्या ठिकाणी वेदना होत असेल तर ती तुमच्या शरीराने दिलेली चेतावनी असते. जर गुडघा दुखत असेल किंवा टाच सुचली असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
रात्रीची चांगली झोप आणि योग्य आहार अत्यंत आवश्यक आहे.
तुमच्यासोबत तुमचा मित्र किंवा जोडीदार धावण्यास येत असेल तर सराव नियमित होण्यास मदत होते, त्याचप्रमाणे आवश्यकता भासल्यास मदतही चटकन मिळू शकते.
अंतिम रेषा सर्वात आधी पार करणे महत्त्वाचे असतेच, पण त्याबरोबर हे साध्य करताना तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल त्यातून अधिक आनंद मिळतो.त्यासाठी शर्यतीमध्ये सहभागी व्हा.