लहान मुलांना गेमिंग झोनमध्ये एकटं सोडताय... मॉलमध्ये 3 वर्षांच्या मुलीबरोबर घडली धक्कादायक घटना

Hyderabad Crime News : हैदराबादमधील एका मॉलमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. हात गेमिंग मशीनमध्ये अडकल्याने तीन वर्षाच्या मुलीला आपली बोटे गमवावी लागली आहेत. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

आकाश नेटके | Updated: May 8, 2023, 06:07 PM IST
लहान मुलांना गेमिंग झोनमध्ये एकटं सोडताय... मॉलमध्ये 3 वर्षांच्या मुलीबरोबर घडली धक्कादायक घटना title=
(फोटो सौजन्य - ANI)

Hyderabad Crime News : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या (summer vacation) लागल्याने आपल्या मुलांना घेऊन फिरण्यासाठी पालक घराबाहेर पडले. उद्याने, मैदान, मॉल्स अशा विविध ठिकाणी फिरण्यासाठी पालक आपल्या मुलांना घेऊन जात आहेत. पण एका पाल्याला आपल्या मुलीला मॉलमध्ये (Mall Accident) घेऊन जाणं चांगलंच महागात पडलं आहे. मॉलच्या गेमिंग मशीनमध्ये हात अडकल्याने चिमुलकल्या मुलीला आपली तीन बोटे गमवावी लागल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये (Hyderabad Police) समोर आला आहे. या प्रकारानंतर मुलीसह पालकांना मोठा धक्का बसला आहे. मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हैदराबादच्या प्रसिद्ध शॉपिंग मॉलमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने मुलीचे पालक हादरले आहेत. शॉपिंग मॉलच्या गेमिंग झोनमधील एक गेमिंग मशिनमध्ये तीन वर्षीय मुलीसाठी जीवघेणा ठरला आहे. गेमिंग मशिनमध्ये हात अडकल्याने मुलीची 3 बोटे कापली गेली आहेत. बंजारा हिल्स रोडवर असलेल्या मॉलमध्ये ही घटना घडली. मॉलच्या चौथ्या मजल्यावरील गेमिंग झोनमध्ये एका गेममध्ये मुलीचा हात अडकला आणि तिला तीन बोटे गमवावी लागली आहेत.

मुलीसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे तिचे पालक संतापले असून त्यांनी आता याप्रकरणी जबाबदार असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. मॉलमधील योग्य सुरक्षा व्यवस्था नसून व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे मुलीला हाताची तीन बोटे गमवावी लागल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. पालकांनी मुलीला यशोदा रुग्णालयात दाखल केले असून रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीवर शस्त्रक्रिया केली आहे.

नेमकं काय घडलं?

 

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने इब्राहिमनगर येथील एक व्यक्ती आपली पत्नी आणि तीन मुलांसह बंजारा हिल्स येथील सिटी सेंटर मॉलमध्ये आला होता. पीडित मुलगी आणि इतर मुले आईसह मॉलमधील चौथ्या मजल्यावर असणाऱ्या गेमिंग झोनमध्ये गेले होते. त्याचवेळी हा धक्कादायक प्रकार घडला. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी गेमिंग झोनमध्ये गेम खेळत असताना गेमिंग मशीनचा मागील दरवाजा उघडा होता. मशीनला धरून ती गेम खेळत होती, तेव्हा अचानक मशीनचा दरवाजा बंद झाला. तिचा हात मशीनच्या गेटमध्ये अडकला गेला. मशिनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता जो दुरुस्त केला गेला नाही. नादुरुस्त असतानाही गेमिंग मशीन सुरु करण्यात आली. त्यामुळेच ही धक्कादायक घटना घडली.

दरम्यान, मुलीच्या कुटुंबियांनी यासाठी मॉल आणि गेमिंग झोनच्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले आहे. घटनेच्या वेळी तिथे कोणताच कर्मचारी नसल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघातामागील खरे कारण कळू नये म्हणून मॉलच्या व्यवस्थापनाने सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. तर गेमिंग झोनमध्ये कॅमेरेच नसल्याचे मॉल व्यवस्थापनाने म्हटलं आहे.