केरळ : डॉक्टरांनी लिहिलेली प्रिस्क्रिप्शन वाचणं म्हणजे डोकेफोडीचं काम. असं म्हटलं जातं की, एकतर ते प्रिस्क्रिप्शन स्वत:ला डॉक्टर समजतं किंवा फार्मासिस्ट. यामुळेच डॉक्टरांना त्यांच्या हस्ताक्षरामुळे नेहमीच टीकेला सामोरं जावं लागतं. पण सध्या सोशल मीडियावर मेडिकल प्रिस्क्रिप्शनचा असा एक फोटो व्हायरल झालाय, जे पाहून लोक थक्क झाले आहेत.
व्हायरल झालेल्या या प्रिस्क्रिप्शनमध्ये औषधांची नावं सुंदर, सुबक आणि स्पष्ट लिहिली आहेत की, ही स्लिप प्रिंटिंग मशिनमधून बाहेर येत असल्याचं लोकांना वाटते. डॉक्टरांच्या या सुंदर हस्ताक्षराचे सगळेच चाहते झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेडिकल प्रिस्क्रिप्शनचा फोटो केरळचे डॉक्टर नितीन नारायणन यांनी लिहिलंय. डॉक्टरांच्या या हस्ताक्षराने सर्वांनाच वेड लावलंय. नेटिझन्स आता सर्व डॉक्टरांना असं स्वच्छ हस्ताक्षर लिहिण्याचं आवाहन करतायत. जेणेकरून रुग्णांना सहज समजेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ नितीन नारायणन हे गेल्या तीन वर्षांपासून पलक्कडमधील नेनमारामध्ये सार्वजिनक आरोग्य केंद्रात रूग्णसेवा देतायत.
डॉक्टरांचे हे प्रिस्क्रिप्शन बेन्सी एसडी नावाच्या सोशल मीडियावर फेसबुकवर शेअर केलंय. यासोबत एक लांबलचक पोस्ट लिहिलीये. ज्यामध्ये हे केरळचे डॉक्टर नितीन नारायणन यांचे हस्ताक्षर असल्याचं म्हटलंय. या पोस्टला खूप लाइक्स आणि शेअर मिळाले आहेत.