टाटा सन्सचे (tata sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांच्या अपघाती निधनानंतर गाडीतील सीटबेल्ट, एअर बॅगचा (Airbag) मुद्दा चर्चेत आला आहे. गाडीच्या अपघातानंतर एअर बॅग किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला माहितचं आहे. अशातच देशातील रस्ते अपघातांची संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत आग्रही होत गाड्यांमधील एअर बॅगबाबत महत्त्वाचे असे निर्णय घेतले आहेत.
मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी कारमध्ये 6 एअरबॅग्ज बसवण्याचा निर्णयाबाबतच्या एका पोस्टमुळे सध्या खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यांनी रस्ता सुरक्षा अभियानाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता, जो हुंडा पद्धतीशी जोडला जात आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये दिसणारा बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) देखील राजकारणी आणि सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी 6 एअरबॅगच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ शेअर केला आहे. '6 एअरबॅगसह वाहनात प्रवास करून जीवन सुरक्षित करा' असे कॅप्शन या व्हिडीओसोबत दिलं आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमारही दिसत आहे. त्यानंतर आता अनेकांनी या व्हिडिओद्वारे हुंडा प्रथेला (dowry) प्रोत्साहन दिले जात आहे असा आरोप केला आहे. मात्र हुंडा घेणे किंवा देणे हा भारतात दंडनीय गुन्हा आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
मात्र, व्हिडिओमध्ये अक्षय कुमारने 'हुंडा' हा शब्द वापरला नाही. तसेच व्हिडिओमध्येही हुंड्याचा उल्लेख नाही. व्हिडिओमध्ये मुलीला लग्नानंतर निरोप घेण्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. यात वडील आपल्या मुलीला लग्नानंतर सासरी पाठवताना रडताना दिसत आहेत. दरम्यान, अक्षय कुमार येतो आणि त्यांना मुलीच्या आणि जावयाच्या सुरक्षेबद्दल सतर्क करतो. तो म्हणतो, 'तुम्ही तुमच्या मुलीला अशा गाडीत पाठवाल तर ती रडणारच ना...'. यानंतर वडील कारच्या फिचर्सची माहिती देतात. परंतु अक्षय 6 एअरबॅगबद्दल विचारतो. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी दुसरी कार दाखवण्यात येते.
6 एयरबैग वाले गाड़ी से सफर कर जिंदगी को सुरक्षित बनाएं।#राष्ट्रीय_सड़क_सुरक्षा_2022#National_Road_Safety_2022 @akshaykumar pic.twitter.com/5DAuahVIxE
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 9, 2022
शिवसेनेकडून टीका
शिवसेना (shivsena) नेत्या आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी ट्विट करत या व्हिडीओवरुन जोरदार टीका केली आहे. ही एक समस्याप्रधान जाहिरात आहे. अशा क्रिएटिव्हला कोण मंजुरी देते? या जाहिरातीतून कारच्या सुरक्षिततेच्या पैलूला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा हुंड्याच्या वाईट आणि गुन्हेगारी कृत्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पैसे खर्च करत आहे का?, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे.
This is such a problematic advertisement. Who passes such creatives? Is the government spending money to promote the safety aspect of a car or promoting the evil& criminal act of dowry through this ad? https://t.co/0QxlQcjFNI
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) September 11, 2022
तर तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनीही या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना, भारत सरकारचा हुंड्याचा अधिकृत प्रचार घृणास्पद आहे, असं म्हटलं आहे.