Sambhajinagar Crime: संभाजी नगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या 21 कोटी घोटाळ्याचा तपास आता वेगाने सुरूये. तपासात नवनवीन माहिती समोर येतीये. या प्रकरणातील आरोपी हर्षकुमार क्षीरसागर अजूनही फरार आहे. पोलिसांनी तपासाचा मोर्चा आता हर्षकुमारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वळवलाय. त्यामुळे कारवाईचा फास आता या अधिकाऱ्यांभोवतीही आवळला जाण्याची शक्यता आहे.
विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून 21 कोटी गायब करणारा हर्षकुमार क्षीरसागर अजूनही बेपत्ता आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे त्यात अनेक धक्कादायक बाबी आता पुढे येऊ लागल्यात. हर्षकुमारकडे असलेल्या आलिशान गाड्यांची माहिती त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती अशी माहिती सूत्रांकडून कळतीये. इतकच नाही तर काही वरिष्ठ अधिकारी आलिशान गाडीतून फिरत असल्याची माहिती सुद्धा पोलिसांना मिळाली. याबाबत आता पोलिसांची तपासाची चक्र फिरत आहे.पोलिसांनी संभाजीनगरच्या क्रीडा उपसंचालकांचं कार्यालय सुद्धा सील केला आहे, सोबत काही महत्त्वाची कागदपत्र जप्त केल्याची माहिती मिळतीये.
आतापर्यंत पोलिसांच्या तपासात हर्षकुमार चा विमानतळाजवळ एक आलिशान 4 बी एच के फ्लॅट तर बीड बायपास वर चार टू बीएचके फ्लॅट आढळून आलेले आहेत. एक बीएमडब्ल्यू कार, एक बीएमडब्ल्यू ची बाईक एक 27 लाखाची चारचाकी गाडी तर फ्लॅटच्या सजावटीसाठी चीन हून आणलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्यात. तर हर्ष कुमारच्या एका अकाऊंट मध्ये तीन कोटी रुपये होते ते अकाउंट सुद्धा फ्रीज करण्यात आलेला आहे.
हर्ष कुमारला मदत करणारे दोन जण सध्या अटकेत आहेत तर हर्षकुमार चा शोध जोरात सुरू आहे मात्र या घोटाळ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आणि त्या दृष्टीने आता तपासाला वेग घेतला आहे. त्यामुळे आता पोलिस तापासात आणखी काय काय समोर येईल ते पाहावं लागेल.