मुंबई : आगामी काळात भारतीय जनता पक्षाशी युतीची तयारी संभाजी ब्रिगेड पक्षाने दर्शवली आहे. मराठा सेवा संघाचे मुखपत्र असलेल्या मराठामार्ग या नियतकालिकेत मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांनी याबाबतचा लेख लिहिला आहे. संभाजी ब्रिगेड हा मराठा सेवा संघ पुरस्कृत राजकीय पक्ष आहे. या पक्षाने निवडणुकीच्या तयारीला लागावे असं खेडेकर यांनी लेखात म्हटलं आहे. स्थापनेच्या 32 वर्षांनंतर संभाजी ब्रिगेडने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
पुरुषोत्तम खेडेकर यांच्या लेखानंतर भाजपाच्या विरोधात भूमिका घेणारी संभाजी ब्रिगेड भाजपसोबत जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेला 32 वर्ष झाली असून संभाजी ब्रिगेडने आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलं असून आगामी महापालिका निवडणुकींच्या तयारीला लागा अशी सूचना या लेखातून पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे.
दरम्यान पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे. भाजप हा पक्ष कोणा एका व्यक्तीचा नाही. कोणताही निर्णय समूहाने घेतला जातो. पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आलाच तर आमची नऊ सदस्यांची कोअर कमिटी यावर चर्चा करेल. संभाजी ब्रिगेडच्या कोणाशी चर्चा झालेली नाही. असा कोणताही विषय राज्यातील कोणत्याही नेत्याकडे आला तर त्यांनी माझ्याशी शेअर करायला हवा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
आमचा ऑल इंडिया नव्हे तर ऑल वर्ल्ड पक्ष आहे. त्यामुळे इतक्या सहज आमचा निर्णय होत नाही, त्याची मोठी प्रक्रिया आहे. हे सगळंच हवेतील आहे आणि जर-तर वर मी उत्तर देत नाही अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मावळ इथं दिली.