www.24taas.com, शिर्डी
विद्युत वाहक तारा चोरणाऱ्या चोरट्यांच्या प्रतापामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना नुकतीच घडली. दादरहून शिर्डी-साईनगर रेल्वे स्थानकावर पुणताम्बा नजीक हि घटना घडली. मनमाड ते शिर्डी हा रेल्वेमार्ग सध्या विद्युत वाहक तारांनी जोडण्याचं काम सुरू आहे.
मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून या पट्ट्यातील या वाहक तारा चोरण्याच्या १० पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. या चोरीच्या प्रकारांना आळा बसावा यासाठी या मार्गावरील विद्युत् तारेमधून २२० व्होल्ट करंट सोडण्यात आला होता आणि अलार्मही सेट करण्यात आला होता. चोरांनी चोरीचा प्रयत्न करताच रेल्वे स्थानकावरील अलार्म वाजला.
त्यामूळे चोरी रोखण्यात यश आलं. मात्र या विद्युत तारा इंजिनमध्ये अडकल्यानं सुरक्षेचा उपाय म्हणून गाडी जागीच थांबवण्यात आली त्यामुळे प्रवाशांना जवळपास ४ ते ६ तास गाडीतच काढावे लागले. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचं आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे.