कारगिल युद्धादरम्यान असामान्य साहसाचं प्रदर्शन करणाऱ्या बत्रा यांनी देशासाठी आपले प्राण त्यागले. त्याच्या या हौतात्म्यासोबतच आणखी एक त्याग केला गेला. तो त्याग केला होता कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या डिंपल चीमा यांनी.
महाविद्यालयीन दिवसांपासूनच एकत्र असणाऱ्या डिंपल आणि विक्रम यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. पण, डिंपल यांच्या कुटुंबीयांना मात्र हे नातं मंजूर नव्हतं. असं असूनही त्या दोघांनी मात्र हे नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता.
असं म्हणतात की, मनसा देवी मंदिराला प्रदक्षिणा मारताना या दोघांनी विवाहबंधनाच अडकण्याचा निर्णय घेतला, काहींच्या मते तिथंच बत्रा यांनी डिंपल यांच्या कपाळी आपल्या नावाचं कुंकू लावलं होतं.
विक्रम बत्रा कारगिल युद्धासाठी निघाले. युद्धानंतर लग्न करण्याचा निर्णय त्या दोघांनीही घेतला होता. पण, नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. कारण बत्रा युद्धासाठी गेले ते परतलेच नाहीत.
इथं डिंपल पुरत्या कोलमडल्या होत्या. त्या क्षणापासून हा विरहच त्यांचा सोबती झाला. कारण, डिंपल चीमा यांनी आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.
2017 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 'एकही दिवस असा गेला नाही, जेव्हा मी विक्रमपासून वेगळी झालेय. असं वाटतंय की ते पोस्टींगसाठीच माझ्यापासून दूर आहेत. जेव्हा लोक त्यांच्या यशोगाथेबद्दल बोलतात तेव्हा मला प्रचंड अभिमान वाटतो', असं त्या म्हणाल्या होत्या.
विक्रम आपल्यामध्ये नसल्याची खंत मात्र डिंपल यांना कायम सतावते, कारण या यशोगाथा आणि हे कौतुक ऐकण्यासाठी त्यांनी आपल्यात असायला हवं होतं असंच त्यांना वाटलं.
आम्ही एकमेकांना पुन्हा भेटू.... ज्याचीत्याची वेळ येतेच. इथंही तसंच काहीसं आहे असं म्हणत डिंपल यांनी कायमच स्वत:ची समजूत काढली आहे.
डिंपल चीमा आजही कॅप्टन बत्रा यांच्या कुटुंबाशी जोडल्या गेल्या आहेत. त्या लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि विक्रम यांच्याच आठवणींची साथ आयुष्यभरासाठी स्वीकारली.
एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं फार सोपं असतं. पण, समोरच्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत नि:स्वार्थपणे प्रेमाचं हे नातं आयुष्यभरासाठी निभावणं हे वाटतं तितकं सोपं नसलं तरीही ते अशक्य नाही हेच डिंपल यांनी सिद्ध करून दाखवलं. त्यांच्या या धाडसाला आणि विश्वासाला सलाम!!!