आयपीएल स्पर्धा ही खरं तर फटकेबाजीसाठी ओळखली जाते. पण गेल्या काही हंगामात गोलंदाजाने आपलं वर्चस्व दाखवलं आहे. त्यातही स्पीन गोलंदाजांनी कमाल केली आहे. यापैकीच एक नाव म्हणजे कुलदीप यादव. चायनामॅन कुलदीपने दिल्लीकडून खेळताना गेल्या हंगामात 14 सामन्यात तब्बल 21 विकेट घेतल्या होत्या.
सनरायजर्स हैदराबादचा भेदक गोलंदाज उमरान मलिकवर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात उमरानने 14 सामन्यात तब्बल 22 विकेट घेतल्या होत्या. आपल्या वेगवान गोलंदाजीने उमरान मलिकने भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवली आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत उमरान प्रमुख दावेदार मानला जात आहे.
श्रीलंकेचा स्टार फिरकी बॉलर वानिंदु हसरंगा यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमधून पुन्हा आपली कमाल दाखवायला सज्ज झालाय. टी20 च्या फटकेबाजीच्या फॉर्मेंटमध्ये हसरंगामध्ये आक्रमक फलंदाजीला वेसन घालण्याची क्षमता आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात 26 विकेट घेत तो सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता.
नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीस मालिकेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने. गेल्या काही सामन्यांमध्ये सिराज चांगल्याच फॉर्मात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आयपीएलमध्येही दमदार कामगिरी करायला तो सज्ज झाला आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीत सर्वात पहिला क्रमांक आहे तो भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचं. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या चहलने गेल्या हंगामात 17 सामन्यात एकूण 27 विकेट घेतल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. यंदाही त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.