खराब अंडी कशी ओळखाल?

Feb 19,2024


आपण ब-याचदा जे पदार्थ आपण खातो त्याची क्वालिटी किंवा ते किती ताजे व चांगले आहेत हे बघूनच ओळखतो पण अंड्याच्या बाबतीत हे थोडं कठीण होऊन बसतं. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे अंड चांगलं आहे की वाईट त्या अंड्याची क्वालिटी कशी असेल? खुप वेळा असं होतं की आपण ताजी समजून घरी आणलेली अंडी दुकानदारांनी अनेक दिवसांपासून स्टोर करून ठेवलेली असतात.


लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी अंड हे अत्यंत लाभदायक मानले जाते. पण जर अंडी ताजी व चांगली नसतील तर यामुळे फक्त रेसिपीचा स्वादच बिघडत नाही तर यामुळे आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतात.


अंड्याच्या बॉक्सवर लिहिलेल्या तारखेवरून तुम्ही त्याच्या क्वालिटीचा सहज अंदाज लावू शकता. पण बहुतांश वेळा एक्सपाइरी डेट होऊन गेल्यानंतरही त्याचा वापर केला जातो. अशावेळी जर तुम्ही खरेदी केलेल्या अंड्यावर बॉक्सच नसेल किंवा अंडी तुम्ही कोणत्या लोकल दुकानातून खरेदी केलेली असतील तर मग अंड्यांची गुणवत्ता पारखण्यासाठी तुम्हाला दुसरा मार्ग अवलंबववा लागेल.


आपण कोणत्याही पदार्थाच्या सुगंधावरूनच ओळखू शकतो की तो पदार्थ चांगला आहे की खराब झाला आहे. अनेकदा घरातील एखादा शिळा किंवा आंबलेल्या पदार्थांची ओळख सुद्धा आपल्याला त्याच्या वासावरूनच होते. अंडी शिजवलेली आहेत की कच्ची याचा काहीह फरक पडत नाही.


तुम्ही दोन्ही पद्धतीच्या अंड्यांचा वास घेऊन शोध लावू शकता. सर्वप्रथम अंड फोडून एका प्लेटमध्ये घ्या. त्यानंतर त्याचा वास बघा कसा येतो आहे. जर वास ठीक असेल तर त्याचे सेवन करू शकता. पण त्यातून सडलेला किंवा घाण वास आला तर ते फेकून द्या.


अंड ताजं आहे की जुनं, खराब आहे की चांगलं हे पाहण्याचा सर्वात जुना आणि रामबाण उपाय आहे तो म्हणजे अंड पाण्यात टाकून बघणं. जर अंड बुडून पाण्याच्या तळाला गेलं तर समजून जा की ते चांगलं व ताजं आहे आणि अंड पाण्याच्या वरच तरंगू लागलं तर समजून जा की ते खराब व शिळं आहे.


अंडी ताजी आहेत की जुनी हे पाहण्यासाठी आपण कॅंडल मेथर्ड देखील वापरू शकतो. जेव्हा आपण हे करता तेव्हा आपल्याला अंड्याच्या आत पिवळ बलक आणि त्याच्या आत हवेची पिशवी तयार झालेली दिसेल. हवेची पिशवी जर मोठी असेल तर अंड खराब व जुनं आहे. पण ही पिशवी जर आकाराने छोटी असेल तर अंड ताजं व चांगलं आहे.

VIEW ALL

Read Next Story