मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर आज पंढपूरच्या मंदिरात आलेल्या एका चिमुकल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
आषाढी एकादशीनिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये सपत्नीक विठ्ठल रखुमाईची विधीवत शासकीय महापूजा केली.
सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप डोळ्यात साठवून ठेवत त्याची मनोभावे आराधना करण्याची संधी मला मिळाली, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी या महापूजेचे काही फोटो शेअर केले आहेत.
बुधवारी (28 जून 2023) सायंकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहपरिवार पंढरपूरमध्ये दाखल झाले. त्यांनी आषाढीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरमधील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व सहकारी मंत्री आणि इतर वारकऱ्यांसहीत ते 'ज्ञानोबा- माऊली तुकाराम' गजर करत कलावंतासोबत पाऊले खेळली. राधा कृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर शिंदे फुगडीही खेळले.
पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंबरोबर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याबरोबरच वडील संभाजी शिंदेही विठुरायाच्या दर्शनासाठी आले होते.
एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली या सुद्धा या प्रसंगी उपस्थित होत्या.
मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते मुख्यमंत्री शिंदेंच्या कडेवर बसलेल्या एका चिमुकल्याने. हा चिमुकला म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंचा नातू रुद्रांश आहे.
मुख्यमंत्री शिंदे मानाच्या वारकरी दांपत्यासहीत पुजेसाठी बसलेले असताना रुद्रांश त्यांच्या बाजूलाच बसला होता.
वडील श्रीकांत शिंदेंबरोबर रुद्रांश खेळत असल्याचाही एक फोटो मुख्यमंत्री शिंदेंनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.