जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ पडणार, अशा कठोर शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी जातीवादावर भाष्य केले. एका पुस्तक लोकार्पणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्रात विविध जातींची आंदोलने होत आहेत. त्यापैकी बरेच शिष्टमंडळ मला येऊन भेटतात. मी कधीही जात- पात मानली नाही. त्यामुळे या चुकीच्या राजकारणातून समाज व देशाचा विकास शक्य नाही.
आजच्या पिढीला संघर्षाची माहिती नाही. त्यामुळे आपण एक विचार घेऊन चाललो तरी ही पिढी वेगळाच विचार करताना दिसते. त्यामुळे सगळ्या विचारांमधील मूलभूत गोष्टी लुप्त होणार काय, हा प्रश्न आहे.
राष्ट्रपुरुषांना समाजाचे लेबल अयोग्य शिवाजी महाराजांना मराठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलित , महात्मा ज्योतिबा फुले यांना माळी, टिळकांना ब्राम्हण समाजाचे लेबल लावण्यात आले आहे. हा प्रकार योग्य नाही.
राष्ट्रपुरुषांना आपण अशा विवादात टाकल्यास समाजातून मूलभूत गोष्टी नष्ट होतील. सध्या आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे कोणीही आमचा झेंडा घेते. जसे लोक तसे पक्ष आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.
दरम्यान, याआधीही नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कठोर शब्दात भाष्य केलं होतं. राजकीय पक्षाचा आणि विचारांचा काय संबंध? राजकीय पक्षांचा संबंध निवडणूक जिंकण्याशी असतो. बाकी त्या दृष्टीने ते विचार करतात, असे गडकरी म्हणाले
मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन मै प्युअर चड्डीवाला हूँ. आरएसएसवाला हूँ, वोट देना है तो दो, नही दिया तो भी कोईबात नहीं. मैं काम करते रहूँगा, असेही नितीन गडकरींनी म्हटलं होतं.
एखाद्या व्यक्तीचे विचार तुम्हाला पटत नसतील, पण आयुष्यभर विचाराशी प्रामाणिक राहून त्यासाठी जगणारी लोकं ही समाजात आदर्श असतात. काही मोजकी लोकं तयार होत असतात, असेही गडकरी म्हणाले होते.