प्रवास सुकर करणाऱ्या या Apps ला अनेकांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्वं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. एका क्लिकवर तुम्ही ही कॅब सेवा बुक करून हवं तिथे, अगदी हवं तिथे पोहोचू शकता.
भारताचच म्हणावं तर देशात Ola- Uber या कॅब सेवांना अनेकांचीच पसंत. कॅबसोबतच शेअर्ड कॅब, ऑटो अशाही सुविधा या अॅपमुळं मिळतात.
आता तुम्ही कॅबप्रमाणंच एका अॅपच्या माध्यमातून प्रायव्हेट जेटची ट्रीप लाँच करू शकता. पण, हे भारतात शक्य नसून तुम्हाला त्यासाठी अमेरिका गाठावी लागणार आहे.
KinectAir च्या वतीनं ही सेवा पुरवली जात असून, आता ही कंपनी खासगी विमान संस्थांशी हातमिळवणी करत आहे. ज्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त दरात विमान तिकीटं उपलब्ध करून दिली जात आहेत.
विमान प्रवासाला प्राधान्य देत त्याला दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवणाऱ्या ग्राहकांवर सध्या ही कंपनी लक्ष केंद्रीत करत आहे. ज्यासाठी त्यांनी अधिकृत संकेतस्थळही लाँच केलं आहे.
इच्छुक ग्राहक अमेरिकेमध्ये रिपोझिशनिंग फ्लाइट बुक करून या खासगी विमान सेवेचा आनंद घेऊ शकतात.
किमान अंतरासाठीही विमान प्रवासाची संकल्पना नवी असली तरीही येत्या काळात ती समाजात रूजवण्याचा कंपनीचा विचार आहे. जेणेकरून प्रवाशांना प्रवासाचा वेगळा अनुभव मिळू शकेल. भारतात अद्याप अशी सुविधा सुरु झाली नसली तरीही येत्या काळात तशी शक्यता नाकारता येत नाही.