रेल्वेचं तिकीट बुक करताना ते बुक केल्याक्षणी कन्फर्म असेलच याची काही हमी नसते. थोडक्यात लांब लचक वेटिंग लिस्टमुळं रेल्वेमध्ये काम करणाऱ्या अनेकांनाच असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो.
अनेकदा तर, तिकीट कन्फर्म झालं नाही, म्हणून प्रवासी त्यांचा प्रवास रद्द करतात आणि यामध्ये त्यांना आर्थिक फटकासुद्धा सोसावा लागतो.
प्रवाशांच्या याच समस्या लक्षात घेत IRCTC नं एक नवी सुविधा सुरू केली आहे. जिथं जोपर्यंत तिकीट कन्फर्म होत नाही, तोपर्यंत तुमच्याकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या नव्या फिचरचं नाव आहे, iPay.
आयआरसीटीसीचं अॅप किंवा संकेतस्थळावर या फिचरची माहिती तुम्हाला मिळू शकते. इथं तुमच्या खात्यातून तातडीनं पैसे कापले जाण्याऐवजी तिकीट कन्फर्म होईपर्यंत ही रक्कम रोखून धरली जाईल.
तिकीट कन्फर्म झाल्यानंतरच ती रक्कम प्रवाशाच्या खात्यातून वजा केली जाईल. थोडक्यात तिकीट काढताना प्रवाशांना कोणतीही रक्कम भरावी लागणार नाहीय.
येत्या काळात वेटिंग लिस्ट ही संकल्पना कायमस्वरुपी बंद करण्यासाठी म्हणून आपण प्रयत्नशील असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.