हवामानातील बदलांचा परिणाम फक्त मानवी जीवनावरच नाही, तर प्राणीमात्र आणि जलचरांवरही होताना दिसत आहे.
या सातत्यपूर्ण बदलांमुळं समुद्रातून मिळणाऱ्या ताज्या मासळीचं प्रमाण खूप कमी झालं आहे. परिणामी ताज्या मासळीचे भाव गगनाला भिडले असून, खवय्यांचे मात्र वांदे झाले आहेत.
अलिबाग हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असल्यामुळे इथं कायमच गर्दी पाहायला मिळते. पर्यटकांसाठी इथं दुसरं आकर्षण म्हणजे ताजी मासळी आणि मत्स्याहार.
अलिबाग परिसरातील समुद्र किनाऱ्यांवर येणारे पर्यटक आवर्जून कोळंबी, सुरमई, पापलेटवर ताव मारतात.
सध्या मात्र हवामानात सातत्याने होणारे बदल, वाऱ्याचा वाढता वेग यामुळे मासळीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. या कारणानं थोड्याथोडक्या प्रमाणात उपलब्ध होत असलेल्या मासळीचे भावही वाढले आहेत.
यावर पर्याय म्हणून जीभेचे चोचले पुरवत आणि खर्चाचा फार मारा न होऊ देता खवय्यांनी ताज्या मासळी ऐवजी आता सुक्या मासळीवर समाधान मानत आहे. ही मंडळी मासळीचे दर केव्हा कमी होणार याच प्रतीक्षेत असताना तिथं सुक्या मच्छीनं बाजार गाजवला असं म्हणायला हरकत नाही.