यंदाचा आयसीसी वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला असून 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यांच्या दरम्यान खेळवला जाणार आहे.
अशातच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने टूर्नामेंटपूर्वी क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
वर्ल्ड कप 2023 सामन्यांच्या तिकिटांची प्रचंड मागणी लक्षात घेता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी सुमारे चार लाख तिकिटं जारी केलीयेत.
दरम्यान या चार लाख तिकिटांमध्ये भारताच्या सामन्यांची किती टक्के तिकिटं असतील याबाबत बीसीसीआयने स्पष्टता दिलेली नाही. जास्तीत जास्त चाहत्यांना तिकीट उपलब्ध व्हावं यासाठी हे पाऊल उचललं जातंय.
बीसीसीआयने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, 'जगभरातील क्रिकेटप्रेमी आता वर्षातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांची जागा बुक करू शकतात.
त्यानुसार 8 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून सर्व सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरू होईल.