#METOO कॅम्पेनमुळे सगळेच कामाला लागल्यासारखं चित्र आहे... बॉलिवूड कलाकार..... मीडिया... वकील... पोलीस... महिला आयोग... सिन्टा वगैरे वगैरे... मुळात नाना पाटेकर काय... आलोकनाथ काय .... विकास बहल काय... किंवा अगदी तनुश्री दत्ता ... कंगना काय, कोणीच धुतल्या तांदळासारखे नाहीत... आता इतक्या वर्षानंतर हे प्रकरण का पुढे आणतायेत...
पब्लिसिटीसाठी...की कुठेतरी अत्याचारामुळे दाबला गेलेला आतला आवाज #METOO कॅम्पेनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खराखुरा प्रयत्न आहे, असे अनेक मुद्दे...चर्चा या रंगत आहेत...एक विचार असा येतो की तेव्हा काही तरी मिळावं म्हणून या अभिनेत्री, मॉडेल तयार होतात...आणि मग फसवलं...अत्याचार केला म्हणून आवाज उठवतात...आपण कसं वागावं....समोरच्याला आपल्याबाबत वागण्याची किती मुभा द्यावी हे तर आपल्या हाती असतं...नंतर आवाज उठवून काय उपयोग...समोरचा पुरुषही बाई कशी आहे, हे पाहूनच पाऊल उचलत असतो...मग तुम्ही त्याला बोट दिलंत तर तो हात पकडणारच...जेव्हा हात पकडणार हे कळत तेव्हाच त्याला खडसावलंत तरच फायदा...अन्यथा सगळं करून झालं...त्याचा मोबदला मिळवून झाला की फसवलं म्हणून ओरडून काहीच उपयोग नाही.
उलट एक स्त्री असूनही मला वाटतं की #METOO कॅम्पेनचा बॉलिवूडमधल्या ज्या काही सो कॉल्ड अभिनेत्री, मॉडेल आहेत त्या उगाचच गैरफायदा तर घेत नाही आहेत ना...हो मात्र असं म्हणून मी कुठेही सलमान, आलोकनाथ किंवा अगदी नानाचीही बाजू घेतेय असं नाही तर...निदान बॉलिवूडमधल्या काही अभिनेत्रींनी पडद्यावर दिसणाऱ्या चेहऱ्यांचे पडद्यामागचे खरे मुखवटे पुढे आणण्याचं धाडस तरी दाखवलंय...या ग्लॅमरच्या दुनियेत हे असंच असतं...तुम्ही नाही स्विकारलंत तर मागे पडता...विरोध केला की बॅन होता...ब्ला...ब्ला...ब्ला...ही वाक्य पूर्वीपासूनच चालत आलेली...मात्र ज्या कोणी पहिल्या स्त्रीने आपल्यावरची वाईट नजर, आपल्या शरीराचा वापर या साऱ्यांना खुलेआम करू दिला...त्यामुळे या अशा लोकांची हिंमत वाढत गेली..तिथल्या तिथे समोरच्याला जाब विचारण्याएवढी ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये निश्चितच असते...आणि ती ताकद आणि शक्ती तुमच्यात नसेल तर तुमच्यापेक्षा त्या वेश्यांना ताठ मानेने जगता येतं असंच म्हणेन मी...
जे काही आहे ते खुलेआम स्विकारतात...हो आम्ही शरीराचा धंदा करतो हे म्हणण्याची ताकद त्यांच्यात असते...नंतर फसवलं म्हणून बोंबाबोंब तरी नाही करत...जर आपल्या शरीराचा आपल्याला अभिमान असेल तर स्त्रीनेही आपल्या शरीराचा वापर कोणाला, कुठे आणि कोणत्या परिस्थितीत करू देतोय याचा विचार करण्याची गरज आहे...लिव्ह इन रिलेशनशीप, अफेअर्स, फ्लर्टींग या नात्यांच्या मायाजाळात अडकत जर आपल्या शरीराचा वापर दुसऱ्याला करू दिला आणि नंतर त्याचा पश्चाताप करताना दुसऱ्यावर आरोप केला तर ते चुकीचं ठरेल...त्यामुळे दुसऱ्यावर बोट दाखवण्याआधी आपण आपला चेहरा पडताळून पाहण्याची गरज आहे...सर्व कायदे...सर्व सहानुभूती स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे स्वत:चीही चूक असताना फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवून उगाच दुसऱ्याचं आयुष्य बरबाद करू नये असं प्रामाणिकपणे वाटतं.
#METOO कॅम्पेन हे त्यांच्यासाठी आहे की खरंच घरात...घराच्या बाहेर आपली इच्छा नसतानाही वाईट कृत्य केलं जातंय...अत्याचार केले जातात...आणि बॉलिवूडबाबत बोलायचं झालंच तर स्त्रीकडे उपभोग या दृष्टीकोनातून पाहणाऱ्यांना आणि तिच्याकडे अमुकच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी करणाऱ्यांना आता दहा वेळा विचार करायला भाग पाडणार असं वाटतंय...निदान एवढं वाटलं तरी #METOO कॅम्पेन यशस्वी होईल. तसेच महिलांबाबत पुरुषांच्या मनात आदराची भावना असली पाहिजे.