मुंबई : सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे. या शोचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या शोप्रमाणेच यातील कलाकार घरा-घरांत पोहचले. आज या प्रत्येक कलाकाराला चाहते त्यांच्या नावाने ओळखतात. मात्र या कार्यक्रमातील अभिनेत्री वनिता खरात तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच वनिताने दिलेल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. 'आसोवा' या युट्यूब चॅनेलला वनिताने एक मुलाखत दिली.
'आसोवा' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत वनिता म्हणाली, "त्या दिवशी मी दादरला माझ्या एका मैत्रिणीला सोडायला गेले होते. तेव्हा तिथे एका कट्ट्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि ती मैत्रीण वॉशरुमला गेली होती. त्यावेळी तिथे दोन पुरुष आले आणि त्यांनी मला विचारलं की, नाशिकला जाण्यासाठी गाडी कुठे मिळेल.. मी त्यांना प्लॅटफॉर्मवर जाऊन विचारा असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा मला विचारलं की बस वगैरे आहे का? त्यावर मी त्यांना जवळच एसटी स्टँड आहे सांगितलं. सोबतच तिथे जाऊन चौकशी करा असंही सांगितलं", असं वनिता म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्यानंतर पुन्हा दोन मिनिटे ते लोक तिथे घुटमळत राहिले आणि त्यांनी थेट मला विचारलं की, इथे अशी काही सोय आहे का? एका तासाची सोय होईल का? मी तो प्रश्न ऐकून थंडच पडले होते. जर मला कोणी अरे केलं तर मी त्याला थेट कानाखाली मारेल अशी मी मुलगी आहे. मात्र, त्यावेळी मी काहीच करु शकले नाही. त्यानंतर माझी मैत्रीण तिथे येताना त्यांनी पाहिलं आणि ते तिथून पसार झाले. पण, मला त्यावेळी प्रश्न पडला की हे माझ्या बाबतीत का झालं असेल? मात्र, हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट किस्सा आहे." असं अभिनेत्री दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. अभिनेत्रीचं हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.
अनेक चित्रपटांमध्ये अशी व्यक्तिरेखा आहेत जी त्यांच्या छोट्या भूमिकांमधूनही खूप चर्चेत असतात. वनिता खरात त्यापैकीच एक. 'कबीर सिंग' चित्रपटात अभिनेत्री वनिता खरातने मोलकरणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिची भूमिका छोटी असली तरी ती आपल्या भूमिकेमुळे खूप चर्चेत आली होती. यानंतर हास्यजत्रा या शोमुळे ती घरा-घरात पोहचली.