मुंबई : अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात पत्नीकडून काहिदिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह सासू, सासरे यांच्याविरोधात पत्नी स्नेहाने गुन्हा दाखल केला होता. मात्र यावर अभिनेता अनिकेत विश्वासराव याने काहिच प्रतिक्रीया दिली नव्हती.
एका मुलाखती दरम्यान अनिकेतने आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी अनिकेत म्हणाला, ''माझी पत्नी स्नेहाने जी माझ्यावर मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली, ती साफ खोटी आहे. कायद्याने अजूनही आम्ही नवरा बायको आहोत. गेले तीन महिने माझी पत्नी स्नेहा आपल्या माहेरी म्हणजेच पुण्यात राहत आहे. आणि मी मुंबईत माझ्या घरी त्यामुळे ती असे आरोप का करते हे मलाच ठाऊक नाही. सध्या मी या प्रकरणावर जास्त काही बोलू शकत नाही कारण या प्रकरणाची पोलीस सध्या चौकशी करतायेत.''
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षाच्या काळात सिनेमा सृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच नाव मोठ होईल.या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देणे,गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर पत्नी स्नेहा दिलेल्या तक्रारीवरून पती अभिनेता अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल झाले होते.