मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या नवोदितांचा बहुचर्चित सिनेमा 'धडक' अखेर सिनेमागृहात धडकलाय. पण 'धडक'चं धडकणं हे थोड्या दिवसात तोंडावर आपटण्यावर येऊ शकतं याची अनुभुती 'सैराट' पाहिलेल्या प्रेक्षकांना येईल. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाने सर्वच रेकॉर्ड तोडून स्वत:चे रेकॉर्ड बनविले. 'धडक' हा 'सैराट'चाच अधिकृत रिमेक आहे. त्यामुळे दोन्ही सिनेमांची तुलना होणं स्वाभाविक आहे. सैराटच्या आसपासही धडकची झलक नसल्याचे सिनेमा पाहिल्यानंतर कळते. तुम्हाला जर जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्याबद्दल कुतूहल असेल तर आणि तरच तुम्हाला हा सिनेमा आवडू शकेल.
सैराटचाच रिमेक असल्याने कहाणी वेगळी सांगण्याची गरज नाही. पौगांडावस्थेतलं प्रेम..जातीव्यवस्था..घरच्यांचा विरोध असं सारं..पण धडक पाहताना ते सैराटच्या तुलनेत मनाला धडकत नाही. मनं अस्वस्थ करत नाही..तुलनेत कथेतील दाहकता फारशी जाणवत नाही. प्रोमोमध्ये क्यूट दिसणाऱ्या जान्हवी म्हणजे सिनेमातील पार्थवीचा डान्स बघण्यासारखा आहे पण अभिनयाची उणीव आहेच. पहिल्या सिनेमाचा उत्साह ईशान (मधु) च्या चेहऱ्यावरून लपून राहत नाही. आशुतोष राणा क्रूर बापाच्या भूमिकेत दिसतोय. जो आपल्या बळाचा वापर करून मधुला तुरूंगात टाकून पार्थवीला घरात कैद करतो. पण इथेही आशुतोष राणाचा ओढून ताणून काढलेला राग आणि आवाजालाच गुण द्यावे लागतील. त्यामुळे एकंदरीत सिनेमागृहात 'धडक'ला नाही तर आपटलाय अशीच प्रतिक्रीया प्रेक्षकांकडुन येतेयं.
आर्ची आणि परश्याप्रमाणे पार्थवी आणि मधुदेखील व्यवस्थेपासून पळत असतात पण या सर्वामध्ये पार्थवीच्या डोळ्यांवरी मसकारा अजिबात खराब होत नाहीए. घरातून पळाल्यानंतर आर्ची हैदराबादला गेली पण पार्थवी कोलकात्याला जाते. अशा अनेक मजेशीर गोष्टी 'धडक' पाहताना तुमच्या लक्षात येतील. एवढं वाचल्यानंतरही तुमची धडक पाहण्याची इच्छा असेल तर उत्सुकता म्हणून नक्की पाहाच.
रेटींग - 2.5