सोनाक्षी सिन्हाविरोधात ३७ लाख रुपये बुडवल्याचा आरोप; गुन्हा दाखल

सोनाक्षी सिन्हासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Updated: Feb 24, 2019, 02:18 PM IST
सोनाक्षी सिन्हाविरोधात ३७ लाख रुपये बुडवल्याचा आरोप; गुन्हा दाखल title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरादाबाद जिल्ह्यातील कटघर येथे एका स्थानिक इव्हेंट मॅनेजरने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोनाक्षीसह इतर पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाक्षी सिन्हाने दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ३७ लाख रूपये घेतले होते. परंतु ऐनवेळी सोनाक्षीने कार्यक्रमास येण्यास नकार दिला. तसंच कार्यक्रमात येण्यासाठी घेतलेले ३७ लाख रूपये परत न केल्याचं इव्हेंट मॅनेजरने सांगितलं. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करूनही आरोपींविरोधात कोणतीही कारवाई न केली गेल्याने तक्रारदाराने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

उत्तरप्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांनी दोन महिन्यांपूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात तक्रार दाखल केली होती. दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी टॅलेंट फुल कंपनीकडून सोनाक्षी सिन्हाला आमंत्रण दिलं होतं. त्यांनी टॅलेंट फुल कंपनी आणि सोनाक्षी सिन्हाच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले होते. याशिवाय दिल्लीत पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची आणि विमान तिकीटांचीही सोय केली होती. कार्यक्रमाच्या दोन तास आधी सोनाक्षीने कार्यक्रमासाठी येण्यास नकार दिला. कार्यक्रमासाठी देण्यात आलेले पैसेही परत केले नसल्याचं शर्मा यांनी सांगितलं. 

प्रमोद शर्मा यांनी पैशांची मागणी केल्यावर त्यांना धमकी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. परंतु कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता संपू्र्ण तपास केल्यानंतर सोनाक्षी आणि इतर आरोपींना नोटीस पाठवण्यात आली असून त्याचं कोणतंही उत्तर त्यांच्याकडून देण्यात आलं नाही. सोनाक्षीसह पाच जणांविरोधात फसवणूक तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.