मुंबई: सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कवियत्री अमृता प्रीतम यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त गुगलकडून एक खास डुडल तयार करण्यात आले आहे. सर्जनशीलतेने रेखाटलेले हे डुडल सध्या गुगलच्या होमपेजवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
३१ ऑगस्ट १९१९ मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असणाऱ्या गुजरांवाला येथे अमृता यांचा जन्म झाला. लाहोरमध्ये लहानाची मोठी झालेल्या अमृता यांचे शिक्षणही तिथेच झाले.
दर्जेदार भारतीय साहित्यिकांमध्येही अमृता प्रीतम यांचे नाव नेहमीच अग्रणी राहिले आहे. अमृता प्रीतम यांनी पंजाबी व हिंदी भाषेत विपूल लेखन केले. सक्षम स्त्री व्यक्तिरेखा आणि बंडखोरपणा यामुळे अमृता प्रीतम यांचे लेखन विशेष गाजले. त्यांनी लिहलेल्या प्रेमकथा, कविता आजही वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.
‘कागज ते कैनवास’ या कवितासंग्रहासाठी १९८१ साली अमृता प्रीतम यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचे आत्मचरित्र 'रसीदी टिकट' खूप गाजले. त्यांच्या अनेक पुस्तकांचा इतर भाषांमध्ये अनुवाद झाला.
याशिवाय, साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांनी १०० हून अधिक पुस्तके लिहली. यामध्ये चरित्र, कविता, पंजाबी लोकगीते यांचा समावेश आहे. आपल्या दर्जेदार लेखनाने त्यांनी भारतीय साहित्यविश्वात नवा मापदंड निर्माण केला.