धुम्रपान करणं फुफ्फुस, हृदय आणि मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांसाठी हानिकारक आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे. पण अनेकदा यामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. ऑस्ट्रेलियातील एक 52 वर्षीय व्यक्ती रोज सिगारेटचं संपूर्ण पाकिट संपवत होता. आपल्या या धुम्रपानाच्या व्यसनामुळे त्याला एक दुर्मिळ आजार झाला आहे. त्याच्या घशात चक्क केस उगवू लागले आहेत. नुकतंच हे आश्चर्यकारक प्रकरण समोर आलं आहे.
झालं असं की ही व्यक्ती सतत खोकला, कर्कश आवाज आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार करत होता. तो जेव्हा रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याच्या घशाचा आतील भाग पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. याचं कारण त्याच्या घशात छोटे केस उगवू लागले होते.
अमेरिकन जर्नल ऑफ केसेसमध्ये नोंदवलेली ही असामान्य स्थिती दीर्घकालीन धूम्रपानामुळे उद्भवणाऱ्या गंभीर गुंतागुंतीवर प्रकाश टाकत आहे. या व्यक्तीचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. 2007 मध्ये कर्कश आवाज, श्वास घेण्यास त्रास आणि सततच्या खोकल्यामुळे ही अज्ञात व्यक्ती प्रथम डॉक्टरांकडे गेली होती. ब्रॉन्कोस्कोपीद्वारे तपासणी केली असता, डॉक्टरांना घसा सुजला असून तिथे बरेच केस वाढले असल्याचं दिसलं. विशेषत: बालपणातील बुडण्याच्या घटनेनंतर ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आली होती तिथे केस उगवले होते.
वयाच्या 10 व्या वर्षी, त्याने ट्रेकियोस्टॉमी केली होती. ही अशी एक प्रक्रिया ज्यामुळे त्याच्या श्वसननलिकेत छिद्र निर्माण झाले. त्याच्या कानातून घेतलेल्या त्वचेच्या आधारे छिद्र स्थिर करण्यात आलं हंत. घशातील याच ठिकाणी केस उगवू लागले आहेत.
डॉक्टरांनी ही एंडोट्रॅचियल हेअर ग्रोथ असल्याचं निदान केलं आहे, जी एक असामान्य स्थिती आहे. हे केस साधारणपणे सहा ते नऊ संख्येने असतात आणि सुमारे 2 इंच लांब असतात. जे घशापासून तोंडापर्यंत जातात. हे केस हटवण्यासाठी त्याला 14 वर्षांपासून दरवर्षी हॉस्पिटलमध्ये जावे लागले. केस बाहेर काढणे आणि संक्रमित फॉलिकल्सवर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केल्याने तात्पुरता आराम मिळत असला तरी केसांची वाढ चालूच राहिली.
2022 मध्ये अखेर त्याला दिलासा मिळाला. त्याने धुम्रपान पूर्णपणे बंद केलं. या सकारात्मक बदलामुळे डॉक्टरांना एन्डोस्कोपिक आर्गॉन प्लाझ्मा कोग्युलेशन नावाची नवीन प्रक्रिया करण्याची परवानगी मिळाली. हे तंत्र केसांच्या वाढीचे मूळ नष्ट करण्यासाठी वापरले जाते, जेणेकरून ते पुन्हा वाढू शकत नाहीत.