Diwali 2022 : दिवाळीचं काऊंटडाऊन आता सुरु झालं आहे. दरवर्षी येणाऱ्या या मंगलपर्वासाठी सध्या प्रत्येकजण सज्ज होताना दिसत आहे. घराघरात साफसफाईची कामं पार पडल्यानंतर गृहिणींनी फराळ बनवण्याचं काम हाती घेतलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जिथे सर्वजण आरोग्यदायी जीवनशैली आपलीशी करताना दिसत आहेत. तिथेच दिवाळीवरही याचे परिणाम दिसून येत आहेत. कारण दरवर्षीच्या साचेबद्ध फराळात काहीतरही बदल करण्यासाठी आता अनेकजणी प्रयत्नशील दिसत आहेत.
साखरेला पर्याय म्हणून काय वापरता येईल याचाच विचार फराळ (Diwali Faral) करताना केला जात आहे. तुम्हालाही असाच प्रश्न पडत असेल, तर त्याचं उत्तर आहे गुळ.
हो. रवा, बेसनाचे लाडू (besan ladoo) करताना तुम्ही साखरेऐवजी गुळाच्या पावडरचा वापर करु शकता. सध्या बाजारात बऱ्याच चांगल्या प्रकारचे गुळाच्या पावडरचे (jaggery powder) प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. फराळाला आरोग्यवर्धक करायचं असल्यास तुम्ही बेसनऐवजी मुगडाळीच्या पिठाचे लाडूही बनवू शकता. गुळ पावडर, मूग डाळीचं पीठ (moong daal) आणि तूर, थोडीशी वेलचीपूड असं एकंदर मिश्रण करुन त्याचे लाडू वळा आणि जादू पाहा.
शंकरपाळ्यांचं (Shankarpali) सांगावं, तर हा पदार्थ तुम्ही गव्हाचं पीठ आणि मैदा समप्रमाणात घेऊन बनवू शकता. यासाठी तुम्ही बाजरीच्या पीठाचाही वापर करु शकता. मुख्य म्हणजे शंकरपाळी तळण्याऐवजी त्यावर तेलाचा स्प्रे किंवा ब्रश फिरवून त्या बेक करणं हासुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. घरात ओटीजी असल्यास करंजीसोबतही तुम्ही हा प्रयोग करु शकता.
करंजीच्या (Karanji) सारणामध्ये रव्याऐवजी भाजलेल्या मुगडाळीचं पीठ वापरून एक चवीष्ट सारण तयार करण्याचा पर्यायही तुमच्याकडे आहे. इतकंच नव्हे, तर लाडूमध्येही तुम्ही नाचणी आणि नारळाचा किस (डेसिकेटेड कोकोनट) वापरून त्यामध्ये गोडपणासाठी खजुराच्या गराचा वापर करुन एक नव्या पद्धतीचा लाडू पाहुण्यांना देऊ शकता.
साखरेऐवजी (Replacement of sugar) शक्य होईल त्या पदार्थात गुळ, गुळ पावडर, खजूर (Dates) यांसारख्या पदार्थांचा वापर करण्याचा पर्याय तुम्ही सोयीनुसार वापरू शकता. फराळ करतेवेळी सध्या बाजारात भेसळयुक्त उत्पादनांचा वेढा वाढला आहे परिणामी तुम्ही वापरत असलेले पदार्थ शुद्ध आहेत ना, याची मात्र काळजी घ्या. यंदाची ही दिवाळी एका नव्या ढंगात, नव्या पद्धतीत आणि तितक्याच आरोग्यदायी पद्धतीनं साजरी करा.
शुभ दीपावली!