मुंबई : दही हे शरीरासाठी चांगलं असल्याचं मानलं जातं. दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, जे लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी खूपच फायदेशीर ठरतात. तसेच हे पचनशक्तीसाठी देखील चांगले असल्याचे मानले जाते. म्हणूनच बरेचसे लोक याचा जेवणात वापर करतात. दह्याचा उपयोग फक्त खाण्यासाठीच नाही, तर अनेक प्रकारच्या पाककृती, त्वचा आणि केसांच्या मजबुतीसाठी केला जातो. म्हणून आपल्याला बहुतांश घरात दही पाहायला मिळते.
बाजारात आपल्याला वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये दही उपलब्ध आहे, पण घरी बनवलेले दही वेगळे असते. परंतु घरी बनवलेल्या दहीबाबत बहुतांश लोकांची तक्रार असते की, ते खूप पातळ किंवा आंबट होतं. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही दररोज गोड आणि घट्ट दही बनवू शकता.
घरगुती आणि नैसर्गिकरित्या गोठवलेले दही हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दही हे चांगले बॅक्टेरिया असलेले नैसर्गिक प्रोबायोटिक आहे, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला अनेक रोगांशी लढण्यास मदत करते.
घट्ट दही बनवण्यासाठी, फक्त दूध गरम करणे पुरेसे नाही, तर घट्ट दही बनवण्यासाठी, तुम्हाला दूध मोठ्या आचेवर गरम करावे लागेल आणि मंद आचेवर सुमारे 20 मिनिटे ठेवून त्याला आटवावे लागेल. मंद आचेवर दूध शिजवल्याने दुधातील ओलावा नाहीसा होतो आणि दुध किंचित घट्ट होते, त्यामुळे दही घट्ट आणि गोड होते.
बहुतेक लोक घरात असलेले जुने दही, ताक किंवा लोण्यापासून नवीन दही बनवतात. दही सेट करण्यासाठी जुन्या दह्याचे प्रमाण किती आहे, याची कल्पना असणे आवश्यक आहे. जुने दही दुधात प्रमाणानुसार मिसळा.
दूध जास्त वेळ सेट होण्यासाठी सोडल्यास दही अनेकदा आंबट होऊ शकते, म्हणून दही सेट होण्यासाठी फक्त 7 तास द्या.
दही बराच वेळ गोठल्यास त्याच्या वर पाणी दिसू शकते. असे झाल्यावर, तुम्ही सूती कापडाने दही गाळून पाणी वेगळे करू शकता. असे केल्याने दही सहज घट्ट होईल.