Home Remedy for Cough and cold: हवेच्या गुणवत्तेचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्री दिया मिर्झानेही मुंबईतील हवेबद्दलची चिंता व्यक्त करताना दुषित हवेचा मुलांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होत असल्याचं सांगत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. खरं तर बदलत्या वातावरणाचा लहान मुलांच्या किंवा बाळांच्या आरोग्यावर लगेच परिणाम होतो. अगदी कोणत्याही ऋतुमध्ये बाळांना किरकोळ आजार उद्भवत असतात. सर्दी, खोकला, कफ अशा सततच्या आजारामुळे बाळासोबत पालकही त्रस्त असतात. जरी अशा आजारांवर डॉक्टरांकडून औषधे घ्यायची म्हटली तरी ती बाळाला किंवा लहान मुलासाठी योग्य असतील ना? किंवा ही औषधे बाळाला मानवतील का? पालकांच्या मनात असे अनेक प्रश्न डोके वर काढत असतात. अशा किरकोळ किंवा नेहमीच्या आजारांवर घरगुती उपचार करणे हे अशावेळी फायद्याचे ठरते. मेडिकलमधल्या औषधांविषयींच्या शंकांना जागा न ठेवता आपल्या घरातील वयस्कर मंडळी किंवा अनुभवी व्यक्तींकडून अशा प्रकारच्या आजारांवर घरगुती उपाय जाणून घेणं हे कधीही अधिक फायद्याचं ठरतं.
आपल्या आजी किंवा आईला घरगुती उपचारांविषयी विचारल्यावर आई लगेच घरातील रोजच्या वापरातील पदार्थांचा वापर करुन जणू एखादी जादूची पोटली तयार करुन देते. या पोटलीमुळे लहान मुलांचा किंवा बाळाचा कफ दूर होतो. सर्दीसुद्धा पळून जाते आणि खोकलासुद्धा बरा होतो. या घरगुती उपचाराचा अवलंब केल्यास बरेच फायदे पाहायला मिळतात. वर्षानुवर्षे चालत आलेला हा उपाय म्हणजेच ओव्याची पुरचुंडी. या पुरचुंडीचा बाळांसाठी किंवा लहान मुलांना झालेली सर्दी, खोकला यांसारखे आजार दूर करण्यासाठी वापर केला जातो. आपल्यापैकी अनेकांच्या घरी बाळांसाठी उपयुक्त असलेल्या पुरचुंडीचा वापर केला असेल किंवा मग याबद्दल सांगितलं तरी असेल.
अनेकांना घरगुती उपायापेक्षा डॉक्टरांचा सल्ला योग्य वाटतो. पण, डॉक्टरसुद्धा या घरगुती उपचाराचा अवलंब करण्याचा सल्ला अनेकदा देतात. कारण हा उपाय करायला अगदी सोपा आहे आणि याचे काहीच दुष्परिणाम नाहीत. ओव्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. डॉक्टरांच्या मते, ओव्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात म्हणूनच ओवा हा अनेक आजारांवर परिणामकारक उपाय ठरतो. ओव्याच्या वासामुळे छातीत साचलेला कफ विरघळून बाहेर पडण्यास मदत होते. छातीचा पिंजरा साफ होऊन कफपासून आराम मिळतो. पोटासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी सुद्धा ओव्याचा वापर केला जातो.
ओवा हा तिखट असल्यामुळे तो जशाच्या तसा बाळांना खायला देता येत नाही. त्यामुळे ओव्याची पुरचुंडी तयार करुन ती बाळाला दिली जाते.
1. अर्धी वाटी ओवा तव्यावर किंवा पॅनमध्ये वास सुटेपर्यंत नीट भाजून घ्या.
2. सूती कापडामध्ये भाजलेला ओवा बांधुन त्याच्या पुरचुंड्या तयार करुन घ्या. तीन ते चार पुरचुंड्या तयार करणे हे जास्त फायद्याचे ठरेल.
3. पुरचुंडी सुटू नये म्हणून ती घट्ट बांधा.
4. बाळाच्या आजूबाजूला या पुरचुंड्या नीट पसरवून ठेवा.
ओव्याच्या वासामुळे बाळाची सर्दी कमी होते. हा उपाय नक्की ट्राय करा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास अथवा अधिक त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)