'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी १३६ जोडप्यांचा होणार 'ब्रेकअप'

१३६ जोडप्यांना 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी दिली घटस्फोटाची तारीख

Updated: Feb 14, 2019, 02:58 PM IST
'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी १३६ जोडप्यांचा होणार 'ब्रेकअप' title=

भोपाळ : १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा केला जातो. प्रेमीयुगल आजच्या दिवशी एकमेकांप्रती आपलं प्रेम व्यक्त करतात. एकमेकांसोबत राहण्याची वचनं दिली जातात. परंतु मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काहीसा विचित्र प्रकार समोर आला आहे. भोपाळमध्ये आजच्या दिवशी १३६ जोडपी आपल्या प्रेमाची कबुली किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी नाही तर चक्क एक दुसऱ्यापासून वेगळं होण्यासाठी एकत्र येणार आहेत. भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात या १३६ जोडप्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू आहे. या सर्व जोडप्यांच्या सुनावणीची तारीख १४ फेब्रुवारी देण्यात आली आहे.

भोपाळमध्ये तीन कौटुंबिक न्यायलये आहेत. प्रिंसिपल बेंच आणि दोन अॅडिशनल न्यायालये आहेत. प्रिंसिपल न्यायालयाच्या एकूण खटल्यांपैकी ३२ घटस्फोटाच्या खटल्यांची सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी आहे. तर पहिल्या अॅडिशनल न्यायालायात ६३ आणि दुसऱ्या अॅडिशनल न्यायालयात ३१ खटल्यांची सुनावणी होणार आहे. घटस्फोटाच्या खटल्यांमध्ये जोडप्यांच्या समस्यांचे परस्पर संवादाद्वारे निराकरण केले जावे यासाठी न्यायालयाकडून जोडप्याला आधी समुपदेशनासाठी पाठवले जाते. 

कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक नूरुंनिसा यांनी सांगितले की, परस्पर संमतीने जोडप्यातील वाद मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. दोघेही खूश राहण्यासाठी त्याच्यांतील मतभेद दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु जेव्हा जोडपे घटस्फोट करण्याच्या निर्णयावर ठाम होतात तेव्हाच खटला पुढे घटस्फोटासाठी न्यायालयात पाठवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.