Viral Video: उत्तर प्रदेशातील बरेलीच्या एसडीएम ज्योती मौर्य (Jyoti Maurya) यांच्यानंतर राजस्थानच्या (Rajasthan) आरएएस अधिकाऱ्याचा व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत अधिकारी केंद्र सरकारने सन्मानित केलेल्या एका महिला कलाकारासाठी अपशब्द वापरले आहेत. अधिकाऱ्याने संतापाच्या भरात तरुणीला सुनावलं आहे. यावेळी त्याने आपण आरएएस टॉपर आहे सांगत तरुणीला अशिक्षित आणि बेशिस्त म्हटलं.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ जयपूरच्या जगतपुरा येथील वृंदा गार्डन अपार्टमेंटमधील आहे. येथे मागील महिन्यात 23 जूनला प्रसिद्ध कथक नृत्यांगना झंकृती जैन आणि आरएएस अधिकारी मोहित पानवरिया यांच्यात वाद झाला होता. याचा व्हिडीओ झंकृती जैनने ट्विटरला शेअर केला आहे. यामध्ये तिने अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.
झंकृती जैनने सांगितलं आहे की, अधिकारी मोहन पनवारिया यांनी मी आरएएस टॉपर असून, तुम्ही लोक अशिक्षित, बेशिस्त आहात असं म्हटलं. अधिकाऱ्याने तरुणाला तिचे कथक क्लासेस बंद कऱण्याचीही धमकी दिली.
झंकृतीने ट्विटरला सगळा घटनाक्रम सांगत व्हिडीओ शेअर केला आहे. तिने याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालय, राज्य महिला आयोग आणि जयपूर पोलिसांकडे तक्रार केली आहे. महिला कलाकाराने खो नागोरिया पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे.
झंकृती जैनने दिलेल्या माहितीनुसार, 23 जूनला संध्याकाळी 6 वाजता ती आपल्या आजोबांच्या फ्लॅटवर डान्स क्लाससाठी पोहोचली आणि डान्स प्रॅक्टिस सुरु केली. याचदरम्यान 6.30 वाजता पहिल्या माळ्यावर राहणारे मोहन पनवारिया आणि त्यांच्या पत्नीने घराबाहेर येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
मोहन पानवरियाने यावेळी डान्स क्लास बंद करा, अन्यथा वाईट परिणाम होतील अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तरुणीने यावर सोसायटीशी बोलण्यास सांगितलं असता मोहित संतापले आणि ओरडू लागले. त्याने फ्लॅटवर लाथ मारत, पाहून घेईन असंही धमकावलं. यानंतर महिला कलाकाराने असुरक्षित असल्याचं सांगत पोलीस ठाण्यात धाव घेतली.