गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, ३ आमदारांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीच्या आधी हा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे.

Updated: Apr 11, 2019, 12:19 PM IST
गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, ३ आमदारांचा राजीनामा title=

अहमदाबाद : लोकसभा निवडणूक २०१९ च्या आधी काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. गुजरातमध्ये पक्षाचे आमदार लागोपाठ पक्ष सोडत आहेत. काँग्रेसचे अल्पेश ठाकोर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. अल्पेश ठाकोर यांच्यासह ठाकोर समुदायाच्या आणखी २ आमदारांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला आहे. धवल सिंह ठाकोर आणि भरत ठाकोर हे काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत.

मागच्या महिन्यात हे ३ आमदार मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना भेटले होते. त्यानंतर हालचाली वाढल्या होत्या. त्यावेळी अल्पेश ठाकोर यांनी ही फक्त औपचारिक भेट असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील भेटले होते. पण आता काँग्रेस सोडल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अल्पेश ठाकोर पाटन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित होते. काँग्रेसने त्यांना तिकीट न देता माजी खासदार जगदीश ठाकोर यांना तिकीट दिलं. त्यामुळे ते नाराज होते. साबरकांठा लोकसभा मतदारसंघातून ठाकोर सेनेने संघटनेच्या एका सदस्याला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. पण काँग्रेसने याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर ठाकोर सेनेने काँग्रेस विरोधात काम करण्याचं ठरवलं.

२४ तासात हालचाली वाढल्या

ठाकोर सेनेने मंगळवारी बैठक घेतल्यानंतर २४ तासात आपली भूमिका मांडण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर गुजरात क्षत्रीय ठाकोर सेनेचे अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ठाकोर सेनेने म्हटलं होतं की आमच्या सोबत राहाय़चं असेल तर त्यांना काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर ३ आमदारांनी आज राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये एक प्रमुख ओबीसी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. राधानपूर मतदारसंघातून विजय मिळवत ते आमदार झाले. पण काँग्रेसकडून फसवणूक झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

३ महिन्यात ८ आमदारांचा राजीनामा

गुजरातमध्ये मागील ३ महिन्यात ८ आमदारांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. उंझामधून निवडून आलेल्या आशा पटेल, वरिष्ठ नेते जवाहर चावडा, जामनगरचे वल्लभ धारविया, ध्रांगध्रा-हलवदचे पुरुषोत्तम साबरिया यांनी याआधी काँग्रेसला रामराम केला आहे.