परीक्षेचा निकाल लागताच नऊ मुलांनी मृत्यूला कवटाळलं; दोन विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात नऊ शालेय विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेश बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर 48 तासांत शाळकरी विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. 

आकाश नेटके | Updated: Apr 29, 2023, 11:28 AM IST
परीक्षेचा निकाल लागताच नऊ मुलांनी मृत्यूला कवटाळलं; दोन विद्यार्थी रुग्णालयात दाखल title=

Exam Results : परीक्षेचा निकाल (Result) लागताच नऊ मुलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये अद्यापही परीक्षांचा तणाव किती मोठ्या प्रमाणात आहे हे उघड झाले आहे. आंध्र प्रदेश बोर्ड ऑफ इंटरमिजिएट एक्झामिनेशनने (Andhra Pradesh Board of Intermediate) बुधवारी इयत्ता 11वी आणि 12वीचे निकाल जाहीर केल्यानंतर आंध्र प्रदेशातील नऊ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. निकालानंतर 48 तासांत घडलेल्या सामुहिक आत्महत्येच्या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे.

आणखी दोन विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुमारे 10 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 61 टक्के विद्यार्थी हे 11वीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तर 72 टक्के विद्यार्थी 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आंध्र प्रदेश बोर्ड ऑफ इंटरमिजिएट एक्झामिनेशन बोर्डाने बुधवारी निकाल जाहीर करताच 48 तासांत 9 विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळले. माध्यमांच्या वृत्तानुसार एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने श्रीकाकुलम जिल्ह्यात ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. दांडू गोपालपुरम गावातील इंटरमिजिएटच्या प्रथम वर्षाचा हा विद्यार्थी बहुतांश पेपरमध्ये नापास झाला होता. त्यामुळे तो निराश झाला होता आणि त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

दुसरीकडे, मलकापुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिनादपुरम येथील 16 वर्षीय मुलीने तिच्या घरी आत्महत्या केली. इंटरमिजिएटच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने काही विषयात नापास झाल्यामुळे नाराज होत आत्महत्या केली. विशाखापट्टणममधील कांचरापलेम भागात आणखी एका 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. तो इंटरमिजिएटच्या दुसऱ्या वर्षात एका विषयात नापास झाला होता. इंटरमिजिएट परीक्षेत नापास झाल्याने चित्तूर जिल्ह्यातील दोन 17 वर्षीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यातील एका विद्यार्थिनीने तलावात उडी घेतली तर दुसऱ्या मुलाने कीटकनाशक प्यायले. अनकापल्ले येथे आणखी एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेतला. 

सरन्यायाधिशांनीही व्यक्त केली चिंता

दरम्यान, देशातील महाविद्यालयांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत असतानाच धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतातील आयआयटीच्या वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये या वर्षात आतापर्यंत चार विद्यार्थ्यांचा आत्महत्येमुळे मृत्यू झाला आहे. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी फेब्रुवारीमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली होती. आपल्या शिक्षण संस्थांमध्ये असे काय चालले आहे की विद्यार्थी आपला जीव द्यावा लागत आहे?, असा सवाल सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केला होता.