Badrinath Temple Story : हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या प्रत्येक रुढी आणि प्रत्येक कृतीमागे, प्रत्येक धारणेमागे काही कारणं आहेत. देवाला कुंकू, अष्टगंध लावण्यापासून ते वस्त्र अर्पण करण्यापर्यंत, नैवेद्यापासून ते अगदी देवापुढे शंख वाजवण्यापर्यंत प्रत्येत गोष्टीमागे एक कारण आहे. तुम्हाआम्हाला यातली बरीच कारणं ठाऊकही असतील. देशातील बहुतांश मंदिरांमध्ये सर्रास शंख वाजवला जातो. देवाधिकांच्या आरतीमध्ये या शंखाचा वापर होताना दिसतो. अनेकांच्या घरातही सकाळच्या वेळी देवपूजेदरम्यान शंखनाद केला जातो. पण, बद्रिनाथ धाममध्ये मात्र शंखनाद केला जात नाही.
(Gangotri, Yamunotri, Kedarnath, Badrinath) गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ या चार धामांपैकी एक असणाऱ्या बद्रिनाथ मंदिरात शंख वाजणवण्यास मनाई आहे. श्री विष्णूंच्या बद्रिनारायण अवताराची इथं पूजा होते. 3.3 फूट उंच शाळिग्रााच्या मूर्तीची इथं भाविक मनोभावे पूजा करतात. असं म्हणतात की, खुद्द महादेवाचाच अवतार असणाऱ्या आदि शंकराचार्यांनी आठव्या शतकामध्ये या मंदिरातील मूर्तीची स्थापना केली होती.
काही मान्यांनुसार इथं ही मूर्ती नेमकी कोणी स्थापित केली याचा संदर्भ नसून, काहींच्या मते ही मूर्ती आपोआपच या ठिकाणी स्थापित झाली. अशीही मान्यता आहे की, हे तेच ठिकाण आहे जिथं विष्णूनं तपश्चर्या केली होती. आता तुम्ही म्हणाल याचा आणि शंखनादाचा काय संबंध?
बद्रिनाथ मंदिरात प्रचलित असणाऱ्या कथेनुसार एक वेळ अशी होती जिथं हिमालयात दानवांनी बराच गोंधळ घातला होता. ज्यामुळं ऋषीमुनींना मंदिरातच काय, तर इतर कुठंही देवाची पूजाअर्चा करता येत नव्हती. राक्षसांची दहशत आणि त्यांनी माजवलेला त्राहिमाम पासून ऋषीमुनी अगस्त्य यांनी मदतीसाठी देवी भगवीच्या नावाचा धावा केला.
ऋषीमुनींनी दिलेली साद ऐकल्यानंतर देवी भगवतीनं कुष्मांडा देवीच्या रुपात प्रकट झाली आणि तिनं त्रिशुळ, कट्यार अशा अस्त्रांनी असुरांचा नाश केला. देवीच्या क्रोधाग्नीपासून पळ काळत अतापी आणि वातापी या दोन असुरांनी तिथून पळ काढला. यापैकी अतापी मंदाकिनी नदीमध्ये लपला तर, वातापी बद्रिनाथ मंदिरात जाऊन एका शंखात लपला. त्या क्षणापासून या मंदिरात शंख वाजवला जात नाही असं म्हणतात.
असुर आणि देवतांच्या संघर्षाची पौराणिक कथा वगळता बद्रिनाथ मंदिरात शंखनाद न करण्याचं शास्त्रीय कारणंही सांगण्यात येतं. असं म्हणतात की इथं शंखनाद केल्यास त्याचा आवाज बर्फावर आदळून ध्वनिलहरी निर्माण करेल आणि त्यामुळं बर्फाच्या पर्वतांना तडेही जाऊ शकतात ज्यामुळं या भागात हिमस्खलनाचा धोका वाढू शकतो. याच कारणास्तव बद्रिनाथ मंदिरात शंखनाद केला जात नाही.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि धारणांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24तास याची खातरजमा करत नाही. )