HDFC Bank Loan : रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण (RBI) जाहीर केलं जाण्याआधीपासून देशाच्या आर्थिक क्षेत्रात अनेक घडामोडी आणि मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळालं. बँकिंग क्षेत्रही यात अपवाद ठरलं नाही. उलटपक्षी एकीकडून खातेधारकांना व्याजदरात कपात होऊन कर्जाचा हफ्ता कमी होण्याची अपेक्षा असतानाच दुसरीकडे एचडीएफसी बँकेकडून मात्र वेगळाच पर्याय निवडण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
देशातील मोठ्या खासगी बँकांपैकी एक असणाऱ्या एचडीएफसी बँकेनं बुधवारी मार्जिनल कॉस्ट ऑफ लँडिंग रेट्स म्हणजेच एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. ज्यामुळं याचा थेट परिणाम आता होम लोन अर्थात गृह कर्ज, कार लोन/ वाहन कर्ज, पर्सनल लोनवर होताना दिसणार आहे. ज्यामुळं दैनंदिन खर्चावरही याचा थेट परिणाम नाकारता येत नाही.
एचडीएफसी बँकेतील अनेक कंन्ज्युमर कर्जांच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळं हा अनेकांसाठीच मोठा धक्का ठरत आहे. उपलब्ध माहितीनुसार सध्या एचडीएफसीकडून एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे. ज्यामुळं त्याच्याशी संबंधित सर्वच कर्जांचा हफ्ता (EMI) गुरुवारपासून वाढणार आहे. एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) च्या अधिकृत संकेतस्थळावरही यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारी 2023 पासून ही नवी आकडेवारी लागू झाली, जिथं कंन्ज्युमर लोनशी संबंधित वर्षभराचा एमसीएलआरही 5 बेसिस पॉईंट्सनं वाढवण्यात आला आहे. त्यामुळं आता हे आकडे 9.25 हून 9.30 वर पोहोचले आहेत. बँकेकडून 2 वर्षांचा एमसीएलआर आता 9.30 वरून 9.35 वर पोहोचला आहे. तीन वर्षांचा एमसीएलआर मात्र स्थिर असून, 9.30 टक्के इतकाच आहे.