Rajastan Crime News: राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यामध्ये एक फारच विचित्र घटना घडली आहे. येथे संतापलेल्या एका जावयाने आपल्या सासरवाडीमध्ये सासू-सासऱ्यांच्या घराच्या मागच्या बाजूला आग लावून दिली. या आगीमध्ये 5 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जावयाचा हा रुद्रावतार पाहून सासरचे सारेच लोक थक्क झाले. पत्नीने माहेरुन परत येण्यास नकार दिला. पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या या व्यक्तीने फार गोंधळ घातला. त्याने बराच वेळ वाद घातल्याने संपूर्ण गाव या घराभोवती गोळा झाला. सासरच्या व्यक्तींना शिव्या देताना, अपशब्द वापरत या व्यक्तीने सासऱ्यांच्या घरावर दगडफेक सुरु केली. दगडफेक करुन घराच्या खिडकीच्या सर्व काचा या व्यक्तीने तोडून टाकल्या. राग थोडा शांत झाल्यानंतर ही व्यक्ती तिथून निघून गेल्यानंतर गावकऱ्यांनी घरात शिरुन या व्यक्तीच्या सासरच्या लोकांना बाहेर काढलं. सासरच्या लोकांनी आपल्या जावयाविरोधात पोलिसांकडे लेखी तक्कार केली.
हा संपूर्ण प्रकार मागील रविवारी भीलवाडा जिल्ह्यामधील आसींद पोलीस स्टेशनच्या हद्दीत सरेरी गावामध्ये झाला. आसींद पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी सरेरी गावामध्ये खरोखर हा प्रकार घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सरेरी येथील रहिवाशी असलेल्या बालू सारस्वतने 10 महिन्यांपूर्वी आपली मुलगी पूजा हिचं लग्न भीलवाडामधील किशन नावाच्या तरुणाशी लावलं होतं. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी किशनने पूजाला चुकीची वागणूक देण्यास सुरुवात केली. किशन पूजाला बेदम मारहाण करायचा. याला कंटाळून पूजा किशनचं घर सोडून माहेर निघून आले. पूजाने माहेरी येऊन पोलिसांकडे किशनविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रारही दाखल केली.
पूजा माहेरी निघून गेल्याने किशन चांगलाच संतापला. पूजाने परत यावं यासाठी तो तिच्यावर दबाव टाकू लागला. किशन फोनवरुन सासरच्या लोकांना शिव्या शाप देत असे. त्यानंतर त्याने सासरच्यांना शिव्या देण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतरही मनासारखं काहीच घडत नसल्याने किशन चांगलाच संतापला. रविवारी तो थेट आपल्या सासरी पोहोचला. सासरच्या लोकांना शिव्या देतानाच त्याने घरावर दगडफेक केली. त्यानंतर संतापलेल्या किशनने घराच्या मागे असलेल्या गोठ्यात गेला. किशनने घराच्या मागील बाजूला असलेल्या गोठ्यातील चाऱ्याला आग लावली. गोठ्यातील 5 जनावरं या आगीमध्ये भस्म झाली. किशन गोठ्याला आग लावून निघून गेला. तो निघून गेल्यानंतर घरातील लोक बाहेर पडले. त्यानंतर गावातील इतर लोकांनी त्यांना धीर दिला. यानंतर किशनविरोधात पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.