नवी दिल्ली : मुंबईसह महाराष्ट्रात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. तिथे नंदुरबारमध्ये पारा 3 अंशावर पोहोचलला आहे. तर काही ठिकाणी राज्यात दवबिंदू गोठण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतही पारा 16 अंशांवर आला आहे. संपूर्ण देशातही सध्या असंच चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच उत्तरेकडी राज्यांमध्ये बर्फवृष्टीलाही सुरुवात झाली आहे. (India cold wave)
हिमाचलप्रदेशातील तिबेट सीमेनजीक असणाऱ्या लाहौल स्पिती खोऱ्यामध्ये तापमान उणे 25 अंशावर पोहोचलं आहे.
हिवाळा चांगलाच जोर धरत असल्यामुळं इथं सर्वत्र बर्फाची चादर पाहायला मिळत आहे.
इतकंच नव्हे तर अनेक जलस्त्रोत गोठले आहेत. चंद्रभागा नदीचा प्रवाहही बर्फात रुपांतरीत झाला आहे.
लाहौलमध्ये मोसमातील सर्वात थंड रात्रीचा अनुभव तेथील नागरिकांनी घेतला.
दिवस उजाडताच जेव्हा सुर्याची किरणं बर्फावर पड़ली तेव्हा बर्फ वितळण्यास सुरुवात झाली. अशा परिस्थितीमध्ये हिमखंड तुटण्याचं संकट पाहता नागरिक सतर्क दिसले.
दरम्यान, हवामान काही अंशी सुरळीत होताच लाहौल भागात 'बीआरओ'क़डून दरीनजीक असणाऱ्या किलाँग दारचा, किलाँग अटल टनल नॉर्थ पोर्टलपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं काम तेजीनं हाती घेतलं.
पुढील काही दिवस तापमानाचा पारा असाच खाली जात राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हे पाहता नागरिकांनाही सतर्क करण्यात आलं आहे.
देशाच्या उत्तरेकडे आलेल्या या लाटेचे पडसाद संपूर्ण देशात दिसणार असून, हवामानात गारवा जाणवेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.