नवी दिल्ली : गुन्हेगारीचा उकल कशा प्रकारे करण्यात आला यासंदर्भातले शो, सिरियल्स सध्या टीव्हीवर सुरू आहेत. हाच शो पाहून एका तरुणाने दोघांची हत्या केली आणि पोलिसांपासून बचावासाठी एक शक्कल लढवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
छत्तीसगढमध्ये ११ जानेवारी रोजी झालेल्या डबल मर्डर प्रकरणाचा खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी २० वर्षीय नीरज मारकम याला अटक केली आहे.
११ जानेवारी रोजी मध्यरात्री आरोपी नीरज याने धारदार शस्त्राने १९ वर्षीय दिनेश आणि त्याची ५० वर्षीय आई अमृता यांची हत्या केली. इतकचं नाही तर, आपल्या बचावासाठी आरोपीने क्राईम शोजवर दाखवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आधार घेतला होता.
आरोपी नीरजने आपल्या कबुलीजबाबात सांगितलं की, दिनेश नागरच्या बहिणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. आमच्या प्रेम प्रकरणाबाबत त्यांच्या घरी कळलं आणि त्यांनी माझ्या प्रेयसीला नातेवाईकांकडे राहण्यास पाठवलं. त्यानंतर मी तिच्या आई-वडिलांना आणि भावाला मारण्याचा कट रचला.
ठरल्याप्रमाणे मी ११ मध्यरात्री दिनेशच्या घरी गेलो आणि दिनेश, त्याच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला.
आरोपीने सांगितलं की, क्राईम शो पाहून मी पूरावे नष्ट करण्याचा प्लॅन केला होता. हल्ल्यात वापरलेल्या शस्त्रावर बोटांचे ठसे लागू नये म्हणून मी बोटांवर सेलोटेप लावला होता. तसेच इतर साहित्य जाळून टाकले.
आरोपीने क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया सारखे शोज पाहून हे कृत्य केल्याने पोलिसांसोबतच इतरांनाही धक्का बसला आहे.