मुजफ्फरपूर : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मेंदुज्वरामुळे 126 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर या आजाराबद्दल लोकांमध्ये जागृती नसल्याने हा वेगाने पसरतोय. यासाठी केंद्र सरकारपासून राज्य सरकार पर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. मुजफ्फरपूर सध्या मेंदुज्वराच्या आजाराने त्रस्त आहे. इथल्या सर्व रुग्णालयात मेंदुज्वराचे रुग्ण दिसत आहेत. मुलांच्या मृतदेहाचे खच दिसत आहेत. यासाठी केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना जबाबदार धरले जात आहे. मुजफ्फरपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी या दोघांविरोधात खटला भरला आहे. यावर 24 जूनला सुनावणी होणार आहे.
केंद्रीय आणि राज्य आरोग्य विभागाने या आजाराच्या जागृकतेसाठी काहीच उपाययोजना केल्या नाहीत. यामुळेच शेकडो जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप लावण्यात येत आहे. जर लोकांमध्ये याबद्दल जागृकता असती तर मुलांचे जीव वाचले असते असे सांगण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकोप बिहारमध्ये सुरु आहे. असे असतानाही राज्य किंवा केंद्र सरकार यावर गंभीर दिसत नाही. याबद्दल जागृकता नसल्याने आजाराचे प्रमाण वाढल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते.