नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत एनडीए सरकारला राफेल विमान खरेदीचा मुद्दा चांगलाच अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. राफेलच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका असलेल्या काँग्रेस पक्षाणे आपल्या टीकेची धार अधिक तीव्र केली आहे. त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक महत्त्वाचे पाऊल टाकत एका स्वतंत्र टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. ही टास्क फोर्स राफेलमधील कथीत गैरव्यवहारावरून मोदी सरकारला धारेवर धरेन. तसेच, देशभरात जाऊन जन-आंदोलन करेन. राफेलच्या मुद्द्यावरून देशातील सर्व राज्यांमधील सुमारे १६० जिल्ह्यांमध्ये काँग्रेसकडून राफेलच्या मुद्द्यावरून जनजागृती केली जाणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी हे या टास्क फोर्सचे प्रमुख असतील. तसेच, अर्जुन मोढवाडिया, शक्ति सिंह गोहिल, प्रियांका चतुर्वेदी, जयवीर शेरगिल आणि पवन खेडा हे या फोर्सचे सदस्य असतील. भविष्यातील राजकारणाचा वेध घेत राहुल गांधींनी हा टास्क फोर्सची निर्मिती केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही टास्क फोर्स ६ महिन्यांत सुमारे १६० जिल्ह्यांमध्ये जनजागृतीचे काम करेन. या मोहिमेअंतर्गत सुमारे १०० शहरांमध्ये सभा आयोजित केल्या जातील. टास्क फोर्सच्या मोहिमेचा पहिला टप्पा २५ ऑगस्टला सुरू होण्याची शक्यता आहे.