Covid-19 Update: गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. ओमायक्रॉनचा नवा सब व्हेरिएंट JN.1 ने आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये काही प्रमाणात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसतेय. अशातच अमेरिका आणि सिंगापूरसारख्या देशांमध्येही कोरोना पसरला आहे. दरम्यान तज्ज्ञांनी इशारा दिलाय की, या जानेवारी महिन्यात जगभरातील लोकांनी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सावध राहण्याची गरज आहे.
जानेवारी महिन्यात म्हणजेच सध्या सुरु असलेल्या महिन्यात चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ पहायला मिळाली. दुसरीकडे गेल्या 9 आठवड्यांपासून अमेरिकेच्या रूग्णालयात भर्ती होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत असल्याची नोंद करण्यात आली आहे.
भारतातील संसर्गाच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झाल्यास गेल्या दोन आठवड्यांपासून या ठिकाणी दररोज सरासरी 500-600 संसर्गाची प्रकरणे नोंदवली जातायत. जरी गेल्या 2 ते 3 दिवसांत यामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाल्याचं दिसून आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत 272 नवीन कोरोनाच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय जवळजवळ 15 दिवसांनंतर पहिल्यांदाच शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 2990 झाली आहे.
भारतातील संसर्गाच्या स्थितीत थोडी सुधारणा होताना दिसतेय. मात्र तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, चीनमधील संसर्गाच्या बाबतीत हा महिना आव्हानात्मक असू शकतो. चीनमधील ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीमध्ये चीनमध्ये कोविड-19 च्या संसर्गामध्ये आणखी एक वाढ होण्याची शक्यता आहे.
नॅशनल हेल्थ कमिशनचे प्रवक्ते मी फेंग यांनी सांगितलं की, संपूर्ण चीनमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होतोय. श्वसनासंबंधी आजारांच्या रूग्णांमध्ये प्रामुख्याने इन्फ्लूएंझा आणि कोविड -19 आहेत.
चायना नॅशनल इन्फ्लुएंझा सेंटरचे संचालक वांग दयान म्हणतात की, सध्या समोर येत असलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आलंय की नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर, JN.1 प्रकाराची प्रकरणं निश्चितपणे वाढली आहेत. असं असलं तरीही रुग्णालयांमध्ये कोविड-19 चाचण्यांचा पॉझिटीव्हीटी रेट एक टक्क्याच्या खाली राहिला आहे. हिवाळ्याच्या महिन्यांत चीनमध्ये संसर्गाचा वेग वाढण्याचा धोका असू शकतो.
वांग पुढे म्हणाले की, JN.1 प्रकार वाढल्याने आणि लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे जानेवारीमध्ये कोविड-19 चे रुग्ण पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे ही बाब लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहिलं पाहिजे. याशिवाय वृद्ध आणि क्रॉनिक आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी वेळेवर त्यांच्या आरोग्याची तपासणी केली पाहिजे.