मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना ईडी कार्यालयाने नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणामुळे मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोनिया गांधी आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार आहेत, तर ईडी विरोधात काँग्रेस पक्ष राज्यात आंदोलन करणार आहे. आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाकडून मोर्चा काढण्याय येणार आहे. केंद्र सरकारच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे. आज सकाळी 11 वाजता जीपोओ चौकातून निघणाऱ्या या मोर्चामध्ये नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंह सप्रा तसेच इतर पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर, महाराष्ट्रासोबतच देशभरात काँग्रेस पक्षाकडून ई़डी विरोधात आंदोलन केलं जाणार आहे.
याआधी गेल्या महिन्यात नॅशनल हेराल्ड प्रकरणामुळे राहूल गांधी यांची ईडी कडून चौकशी झाली होती. त्यावेळी ईडी विरोधात काँग्रेस पक्षाकडून संपूर्ण देशात आंदोलने करण्यात आले होते. त्यावेळी, काँग्रेस पक्षाकडून दिल्ली येथे विरोध दर्शवून गांधी कुटुंबावरील हे मनी लाँन्ड्रिंगचे आरोप निराधार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आज काँग्रेस खासदार संसदेच्या आत आणि बाहेर आंदोलन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, पक्षाचे जेष्ठ नेते आणि कार्यकर्ते अकबर रोडवरील मुख्यालयात जमतील आणि ई़डी कारर्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे.
याआधी सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी कर्यालायने चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण त्यावेळी सोनिया गांधींना कोरोना झाल्यामुळे त्या ईडीच्या चौकशीसाठी हजर राहू शकल्या नाहीत. त्यांनी ईडीला पुढील तारीख मागितली होती. राहूल गांधी मात्र ई़डी चौकशीसाठी हजर राहिले होते. त्यावेळी राहूल गांधींना 5 दिवसात जवळपास 50 तासांची चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सलग 5 दिवस ईडी कार्यालाया समोर आंदोलन केलं होतं. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ईडी चौकशीला सामोरं जाणार असल्यानं काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आक्रमक होणार आहे.
1938 साली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांनी हे वृत्तपत्र सुरु केलं होतं. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) नावाच्या कंपनीकडे होती. या कंपनीवर काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबाचं वर्चस्व होतं. पण 2008 मध्ये हे वत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावं लागलं. त्यानंतर काँग्रेसने पक्ष निधीतून या कंपनीला 90 कोटी रुपयांच बिनव्याजी कर्ज देण्यात आलं होतं. 2010 मध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 'यंग इंडियन' नावाची नवी कंपनी स्थापन केली. एजेएलला देण्यात आलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के भागिदारी आहे. इतर हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता.