नवी दिल्ली : गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात #BlockNarendraModi हे कॅम्पेन चालविण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या ट्विटर अकाऊंटला पंतप्रधान मोदींनी फॉलो केल्याविरोधात हे कॅम्पेन चालविण्यात आले होते. रिपोर्टनुसार ,पंतप्रधान मोदी कमीत कमी अशा चार अकाऊंट्सना फॉलो करतात ज्यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर आनंद व्यक्त केला. पण या कॅम्पेनचा परिणाम उलटाच झालेला पाहायला मिळत आहे. यातून पंतप्रधान मोदींचे फॉलोअर्स कमी होण्याऐवजी वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
बुधवार पर्यंत ज्यांना मोदी फॉलो करतात त्यांची संख्या तेवढीच राहीली. गुरुवारी कॅम्पेन सुरु असूनदेखील बुधवारच्या तुलनेत ३३.७ दशलक्षावरुन वाढून ३३.८ दशलक्ष झाली. याचा अर्थ कॅम्पेन सुरु असून देखील मोदींच्या फॉलोअर्समध्ये ०.१ दशलक्षाने वाढ झाली.
मोदींविरोधात हे कॅम्पेन कोण चालवत आहे ते सध्या स्पष्ट झाले नाही. पण यामध्ये कॉंग्रेसचे नेते जोडलेले किंवा प्रोफाइलमधून कॉंग्रेसचे समर्थन करणारे पाहायला मिळाले. तसेच खुप सारे सामान्य नागरिकही यामध्ये पाहायला मिळाले. या हॅशटॅगसोबत 'ही आयडीया प्रभावकारी नाही' असेही काहींनी म्हटल्याचे दिसून आले.