Monsoon News : नुकतंच (Skymet) स्कायमेटनं एक वृत्त प्रसिद्ध करत यंदाच्या वर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असणार असल्याची माहिती दिली. ज्यामुळं शेतकरी वर्गाच्या चिंता वाढल्याचं पाहायला मिळालं. पण भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीनं (IMD) स्कायमेटच्या या वृत्ताच्या विरुद्ध माहिती देत देशात यंदा सामान्य पर्जन्यमान राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं यंदा मागील चार वर्षांप्रमाणंच मान्सून येणार आणि आनंद देणार हेच तूर्तास लक्षात येत आहे.
पावसाबाबत स्कायमेटच्या दाव्याला भारतीय हवामान खात्यानं छेद देत यंदाच्या वर्षी सरासरीच्या इतका पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असून, हे प्रमाण समान्य वर्गात गणलं जात असल्याचं सांगितलं. statistical आणि dynamic अशा दोन्ही पद्धतींनी ही आकडेवारी मिळवण्यात आली आहे.
हवामानाच्या निकषांनुसार यंदाच्या वर्षी 67 टक्के सामान्य ते सामन्यहून जास्त पर्जन्यमानाचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या मान्सूनसाठी पूरक महिन्यांमध्येही पर्जन्यमान सामान्य असेल. पेनिंन्सुलर भारत , पूर्व भारत, पूर्व मध्य भारत आणि पूर्वोत्तर भारतातही यंदा सामान्य पर्जन्यमान असेल.
2023 या वर्षात मान्सूनवर al nino चा प्रभाव पाहायला मिळेल. मान्सूनच्या द्वितीय सत्रामध्ये हे परिणाम दिसून येणार असले तरीही यामुळं पर्जन्यमान कमी होणार नसल्याचं आयएमडीतडून अधोरेखित करण्यात आलं आहे. दरम्यान, मागील काही वर्षांमध्ये अल निनोचा प्रभाव असतानाची सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पर्जन्यमान पाहायला मिळालं होतं.
जेव्हा पॅसिफिक समुद्रात पाण्याच्या वरील थराचं तापमान वाढतं, तेव्हा अल निनोचा प्रभाव वाढू लागतो. याचे थेट परिणाम मुख्यत्वे दक्षिण पश्चिम मान्सूनवर होताना दिसतात. 1997 मध्ये अल निनोचा प्रभाव सर्वाधिक दिसून आला होता. पण, त्यावेळीही पर्जन्यमान सामान्यच होतं.
मान्सूनवर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे इंडियन ओशन डायपोल. यावेळी IOD हा घटकही मान्सूनवर सकारात्मक परिणाम करताना दिसणार आहे.
दरम्यान, अद्यापही मान्सूनचा राज्याच प्रवेश झाला नसला तरीही अवकाळी पावसानं थैमान घालणं सुरुच ठेवलं आहे. सध्याच्या घडीला राज्यातील बहुतांश भागांना अवकाळीनं झोडपलं आहे. किंबहुना येत्या 5 दिवसांमध्ये राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला गारपीटीचा तडाखा बसण्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे. कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर कमी असला तरीही इथं रिपरिप सुरु असल्यामुळं नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो असाही इशारा हवामान विभागानं दिला आहे.