जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा कहर; राष्ट्रीय राजमार्ग बंद

सतत होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे बर्फ बाजुला करण्याच्या कामातही अडचणी येत आहेत. 

Updated: Dec 16, 2019, 12:34 PM IST
जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा कहर; राष्ट्रीय राजमार्ग बंद  title=
फोटो सौजन्य : एएनआय

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीर राष्ट्रीय राजमार्ग बंद करण्यात आला आहे. रस्त्यांवर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. सतत होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे बर्फ बाजुला करण्याच्या कामातही अडचणी येत आहेत. 

डोडा भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे घरं कोणती आणि झाडं कोणती हेच कळत नाही. संपूर्ण शहर बर्फाने वेढून गेलं आहे. डोंगरदऱ्या बर्फाने व्यापून गेल्या आहेत. सर्वत्र धुकं पसरलंय. घरांच्या छपरांवरही मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झालाय. नागरिक मशाल पेटवून थंडीपासून कसंबसं स्वत:चं रक्षण करताना दिसतायेत. मात्र पोटापाण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावं लागतंय. 

प्रशासनाकडून हिमस्खलन प्रवण क्षेत्रात जाण्यास बंदी घालण्याच आली आहे. तसंच आत्पकालिन स्थिती आल्यास सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही स्थिती आहे. हवामान विभागाने या भागात आणखी बर्फवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता मात्र हवंहवं वाटणारी बर्फवृष्टी कधी कमी होतेय असंच चित्र जम्मू-काश्मीरमध्ये तयार झालं असल्याचं म्हणण्यास हरकत नाही.