Shocking Fruit Juices Mixed With Urine: उघड्यावरील किंवा विकत मिळणारे अन्नपदार्थ खात असताना त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. रोगजंतू आणि किटकांचा वावर आणि तत्सम कारणांनी ही काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण, आता मात्र एका विचित्र कारणामुळंच अनेक मंडळी या अशा खाद्यपदार्थांकडे पाठ फिरवताना दिसत आहेत, कारण ठरताहेत उघडकीस येणारे काही किळसवाणे प्रकार.
नुकताच गाझियाबाद येथून असाच एक प्रकार उघडकीस आला आणि अनेकांच्या तोंडची चव पळाली. इथं असणाऱ्या लोणी क्षेत्रातील इंदापुरी भागामध्ये ज्यूस विकणाऱ्या एका गाड्यावर विक्रेता चक्क फळांच्या ज्यूसमध्ये लघुशंका मिसळून विकत होता. ज्यूसची चव विचित्र लागत असल्यामुळं स्थानिक ग्राहकांनी तक्रार केली आणि संशय आल्यानं त्यांनी पाहणी केली असता हा विक्रेता फळांच्या रसात लघुशंका मिसळत असल्याची खळबळजनक बाब समोर आली. हा सर्व धक्कादायक प्रकार पाहून ग्राहतांनी या ज्यूस विक्रेत्याला जबर चोप दिला.
स्थानिक ग्राहकांच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच त्यांनी दुकानाची चाचपणी केली. जिथं त्यांना लघुशंकेची एक बाटली आढळली. लगेचच या मंडळींनी या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ बनवत पोलिसांना त्याची माहिती दिली. इतक्यावरच न थांबता संतप्त जमावानं हा किळसवाणा प्रकार करणाऱ्या विक्रेत्यांना चोप दिला. सदर प्रकरणाची महिती मिळताच पोलीसही तातडीनं घटनास्थळी दाखल झढाले आणि त्यांनी दुकानमालकासह दोन्ही आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी ज्यूस आणि मानवी लघुशंकेचे नमुने घेत ते पुढील तपासणी पाठवले.
पोलिसांच्या माहितीनुसार सदर प्रकरणी 29 वर्षीय आरोपी, नाव आमिर या ज्यूस विक्रेत्यासह त्याच्या अल्पवयीन सहकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या तक्रारीनंतर घटनास्थळी दाखल होत तिथं दुकानाची पाहणी केली जिथं, झाडाझडती घेताना त्यांना एका कॅनमध्ये लघुशंका असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी ज्यूस विक्रेत्यांकडे यासंदर्भातील चौकशी करुनही त्यांना समाधानकारक उत्तरं न मिळाल्यामुळं अखेर त्यांनी कारवाईचा बडगा उगारत आरोपींना पोलिसी खाक्या दाखवला.