नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या सोमनाथ मंदिर भेटीवरून मोठा वाद सुरु आहे. या वादावर आता कपिल सिब्बल यांनी भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे हिंदू नाहीत, अशी टीका सिब्बल यांनी केली आहे. हिंदूवाद आणि हिंदूत्व यांचं काही देणंघेणं नाही पण मोदींनी या दोन्ही गोष्टींना एकत्र केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वेळा मंदिरात गेले आहेत, असा सवालही सिब्बल यांनी उपस्थित केला.
२९ नोव्हेंबरला राहुल गांधी सोमनाथ मंदिरात गेले होते. या मंदिरामध्ये राहुल गांधींचं नाव गैर-हिंदूंसाठी ठेवलेल्या वहीमध्ये लिहिण्यात आलं. काँग्रेसनं हे सगळं फेटाळून लावत भाजपवर आरोप केले. तसंच राहुल गांधी हे शिव-भक्त असून जानवं घालणारे हिंदू आहेत, असा दावा काँग्रेसनं केला. ही वही फर्जी असल्याचे आरोपही काँग्रेसनं केले.
काँग्रेसच्या आरोपांवर भाजपनंही प्रत्युत्तर दिलं. सोमनाथ मंदिरामध्ये राहुल गांधींच्या सहकाऱ्यांनीच त्यांच्या नावापुढे गैर-हिंदू असं लिहिल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिली.
राहुल गांधींच्या माध्यम समन्वयकांनी त्यांचं नाव गैर-हिंदूंसाठी ठेवण्यात आलेल्या वहीमध्ये लिहीलं. मंदिरातल्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये काहीही सहभाग नसल्याचं स्पष्टीकरण सोमनाथ मंदिर प्रशासनानं दिलं.
सोमनाथ मंदिरामध्ये हिंदू नसलेल्यांना प्रवेश घेण्याची परवानगी आहे. पण त्यांना मंदिर कार्यालयामध्ये स्वत:चं नाव लिहावं लागतं. राहुल गांधींनी २९ नोव्हेंबरला सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्याची सुरुवात केली. शंकराचं हे मंदिर अहमदाबादपासून ४०० किमी अंतरावर आहे.
मंदिरामध्ये गैर-हिंदूंसाठी असलेल्या वहीमध्ये राहुल गांधींचं नाव आल्यावर याचा फोटो व्हायरल करण्यात आला. या फोटोमध्ये राहुल गांधींबरोबरच काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं नाव आहे. काँग्रेसचे माध्यम समन्वयक मनोज त्यागी यांची सही या वहीवर आहे.