नवी दिल्ली : दिल्लीच्या रस्त्यांवर जवळपास ७ वर्षापूर्वी घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणात आज चारही आरोपींना फाशी देण्यात आली. सगळ्या कायदेशीर अडचणी दूर झाल्यानंतर गुन्हेगारांना फासावर लटकवण्यात आलं. तिहाड जेलमध्ये सकाळी ५.३० मिनिटांनी या दोषींना फाशी देण्यात आली. जेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
फाशी देण्याच्या आधी जेलमधील अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. ज्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. फासावर लटकवण्याच्या आधी जेव्हा दोषींना अंघोळीनंतर कपडे देण्यात आले तेव्हा दोषी विनयने कपडे बदलण्यास नकार दिला. त्यानंतर तो रडू लागला आणि माफी मागू लागला.
दोषींना फाशी देत असताना जेलच्या बाहेर गर्दी झाली होती. दिल्लीतील स्थानिक लोकं, समाजसेवक जेलच्या बाहेर उभे राहून हीच निर्भयाला खरी श्रद्धाजंली आहे अशी भावना व्यक्त करत होते. दोषींना फासावर लटकल्याची माहिती बाहेर येताच उपस्थितांनी समाधानीची भावना व्यक्त केली.
- फाशीच्या आधी सकाळी ४ वाजता दोषींना उठवण्यात आलं. त्यानंतर त्यांना अंघोळीसाठी पाठवण्यात आलं आणि कपडे दिले गेले.
- दोषींना यानंतर कारागृह प्रशासनाने चहा आणि नाश्ता विचारला. पण दोषींनी नाश्ता केला नाही.
- कारागृह प्रशासनाने दोषींना त्यांची शेवटची इच्छा विचारली.
- ठीक ५ वाजून ३० मिनिटांनी तिहाड जेलमध्ये दोषींना फाशी देण्यात आली.
२० मार्च हा दिवस निर्भया दिन म्हणून साजरा केली जाईल अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.
दिल्ली हायकोर्टाने गुरुवारी निर्भयाच्या दोषींची याचिका फेटाळली. ज्यामध्ये फाशीची तारीख पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. या निर्णयाच्या विरोधात दोषींचे वकील सुप्रीम कोर्टात ही गेले होते. पण रात्री ३.३० वाजता सुप्रीम कोर्टाने देखील ही याचिका फेटाळली. त्यानंतर चारही आरोपींना फाशी देण्यात आली.