नवी दिल्ली : नोकरदार वर्गासाठी सर्वात महत्वाची बातमी येत आहे. ज्यांच्या पगारातून पीएफ कापला जातो त्यांना शेअर बाजारात किती रक्कम गुंतवायची याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे जोखमीचे असले तरीही तुम्ही मोठ्या कालावधीसा नियमित किती गुंतवणूक करता यावर तुमचे निवृत्तीवेळी मिळणारे फायदे ठरत असतात. 'कर्मचारी भविष्य निधी संस्थेने' एक महत्त्वाचा प्रस्ताव आणला आहे. याद्वारे नव्या वर्षांपासून पीएफ धारकांना शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवायची की कमी करायची ? याबद्दल पर्याय उपलब्ध होणार आहे.
पीएफ अकाऊंट लॉग इन केल्यावर तुम्हाला एक रक्कम दिसते. पण तुम्हाला हे माहित नसते की EPFO या रकमेची गुंतवणूक कुठे आणि किती करत आहे. तुम्हाला तुमच्या प्रत्येक गुंतवणूकीचा हिशोब मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक वाढविण्यासाठीही याची मदत होणार आहे.
ईपीएफओ खातेधारकांच्या जमा रक्कमेतील 15 टक्के पर्यंतची रक्कम ट्रेडेड फंड (ETE) मध्ये गुंतवली जाते. EPFO कडून या ETF मध्ये आतापर्यंत 55 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. आपल्या खात्यातील किती रक्कम ETF मध्ये जाते हे पीएफ धारकांना अद्याप माहिती नाही. रक्कम कमी करणे किंवा वाढवण्याचा कोणता पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नाही.
कर्मचारी भविष्य निधी संस्था एक नवे सॉफ्टवेअर विकसित करणार आहे. यामध्ये निवृत्ती निधीमध्ये कॅश आणि ETF ची रक्कम वेगवेगळी दाखवली जाईल. सध्याच्या खात्यात केवळ सेव्हिंग दाखवली जाते.