मुंबई : आजही समाजात हुंड्यासारख्या अमानुष प्रथा अनेक तरूणींचं आयुष्य उद्धवस्त करायला कारणीभूत ठरतं.
प्रामुख्याने सरकारी नोकरी असलेले तरूण हुंड्याच्या नावाखाली अनेक महागड्या गोष्टींची मागणी करतात. केवळ हुंड्याची मागणी पूर्ण होत नसल्याने कित्येक कुटुंब उद्धवस्त झाल्याची, लग्न ऐनवेळेस मोडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र राजस्थानातील एक घटना मात्र यासार्यापेक्षा वेगळी घडली आहे.
झुंझनू गावातील एका नवरदेवाने हुंड्यात पाच लाखाची रक्कम घेण्यास नकार दिला आहे. या तरूणाला सरकारी नोकरी आहे. या कृत्यामुळे शेखावटी आणि राजपूत समाजात त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
जयदीप सिंह हा नवरदेव एअरफोर्स विभागात कार्यरत आहे. त्याचे वडील मॅनेजरपदावरून निवृत्त झाले आहेत. जयदीपचा विवाह झुंझूनु जिल्ह्यातील दिलीप सिंह यांच्या मुलीशी ठरला होता.
परंपरेनुसार हुंड्यामध्ये दिलीप सिंह यांनी पाच लाख रूपये देण्याची तयारी केली. शगुन किंवा विधीचा भाग म्हणून पुढे केलेली ही रक्कम जगदीप आणि त्याच्या कुटुंबियांनी विनम्रपणे नाकारली. जयदीप आणि त्याचे वडील हुंड्याच्या विरोधात आहेत.
जयदीप हा उच्च शिक्षित आणि संस्कारी मुलगा आहे. सोबतच त्याची पत्नी डबल एमएस, डीएड आणि बीएससी इतकी शिकलेली आहे.