मुंबई - केंद्रीय मंत्री रामदास आठवले कायमच आपल्या वक्तव्यांसाठी आणि लघुकवितांसाठी प्रसिद्ध आहेत. संसदेतही त्यांचे भाषण सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाकांवरील सदस्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य असते. रामदास आठवले यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आपुलकीचा सल्ला दिला आहे. तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवल्यामुळे राहुल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत. पण त्यांनी आता पापा होण्याची गरज आहे. त्यासाठी राहुल गांधींनी लवकर लग्न केले पाहिजे, अशी मिश्किल टिप्पणी रामदास आठवले यांनी एका पत्रकार परिषेदत केली.
नुकत्याच झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने यश मिळवले. या तिन्ही ठिकाणी भाजपला हरवून काँग्रेस सत्तेवर येणार आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या दोन राज्यांत १५ वर्षांनंतर काँग्रेस सत्तेवर येत आहे. या विजयामुळे राष्ट्रीय राजकारणात राहुल गांधी यांचे महत्त्व आणखी वाढले. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच काँग्रेसला इतके मोठे यश मिळाले आहे. याआधी कर्नाटक आणि गुजरातमधील निवडणुकीतही राहुल गांधी यांनी भाजपला जोरदार टक्कर दिली होती. येत्या मे २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा आक्रमक पवित्रा अनेकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत, मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि छत्तीसगढमध्ये भूपेश बघेल सोमवारीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी मार्मिक टिप्पणी केली.
राहुल गांधी यांच्या विवाहाबद्दल अधूनमधून राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. काहीजण मिश्किल टिप्पणी करून राहुल गांधी यांना चिमटे काढण्याचाही प्रयत्न करतात. रामदास आठवले यांनीही पप्पू आणि पापा या दोन शब्दांचा वापर करीत राहुल गांधी यांना चिमटा काढला.