रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) कोटक महिंद्रा बँकेला (Kotak Mahindra Bank) मोठा झटका दिला आहे. कोटक महिद्रा बँकेला आता ऑनलाइन आणि मोबाईल बँकिंग चॅनेल्सच्या माध्यमातून नवे ग्राहक जोडता येणार नाही. तसंच त्यांना नवे क्रेडिट कार्डही जारी करता येणार नाहीत. आरबीआयने त्यांच्यावर बंधन आणलं आहे. बँकेच्या नियमांची पूर्तता ने केल्याने तसंच आयटी जोखीम व्यवस्थापनात कमतरता आढळल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 2022 आणि 2023 या वर्षांसाठी बँकेची आयटी पडताळणी करण्यात आली असता यामध्ये काही त्रुटी समोर आल्या होत्या. कोटक महिंद्रा बँक या त्रुटींचं आणि समस्या वेळेत आणि नियमितपणे दूर करण्यात अपयशी ठरल्याने ही कारवाई करणं आवश्यक होतं असं आरबीआयने म्हटलं आहे.
"आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, पॅच आणि चेंज मॅनेजमेंट, युजर ऍक्सेस मॅनेजमेंट, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सुरक्षा आणि डेटा लीक प्रतिबंधक धोरण, बिझनेस कंटिन्युटी आणि डिझास्टर रिकव्हरी आणि ड्रिल इत्यादी गोष्टींमध्ये गंभीर कमतरता आणि नियमांचं पालन होत नसल्याचं आढळून आलं," अशी माहिती आरबीआयच्या निवेदनात देण्यात आली आहे.
कोटक महिंद्रा बँकेला त्यांच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहकांना जोडणं, नवीन क्रेडिट कार्ड जारी करणं तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पण याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होणार नाही. बँक त्यांचे सध्याचे ग्राहक, क्रेडिट कार्ड वापरकर्ते यांना आधीप्रमाणे सेवा देणं सुरु ठेवतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.