'आठवड्यातून 70 तास काम', पती नारायण मूर्तींच्या 'त्या' विधानावर सुधा मूर्ती म्हणाल्या, 'मग सुट्टी काय...'

नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान नारायणमूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी यावर आपलं मत मांडलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 12, 2024, 04:14 PM IST
'आठवड्यातून 70 तास काम', पती नारायण मूर्तींच्या 'त्या' विधानावर सुधा मूर्ती म्हणाल्या, 'मग सुट्टी काय...' title=

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांच्या एका विधानामुळे गदारोळ निर्माण झाला होता. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मत व्यक्त करत नाराजी जाहीर करत खडे बोल सुनावले होते. दरम्यान नारायणमूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी यावर आपलं मत मांडलं आहे. 

सुधा मूर्ती यांनी मुलाखतीत सांगितलं की, "मीदेखील या वयात 70 तासांपेक्षा जास्त काम करते. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेतला पाहिजे. तुमच्या कामाबद्दल उत्साही राहा. मग तुम्हाला काम सुट्टीवर असल्याप्रमाणे भासेल". सुधा मूर्ती यांनी या विधानासह आपले पती नारायणमूर्ती यांच्या विधानाला सहमती दर्शवली आहे. 

नारायणमूर्ती काय म्हणाले होते?

"देशाला प्रगती हवी असेल तर तरुणांनी रोज किमान 12 तास काम करायला हवं, म्हणजेच आठवड्याचे 70 तास. तेव्हाच भारत अशा अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करु शकेल, ज्या गेल्या दोन ते दशकांपासून प्रचंड यशस्वी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमधील नागरिकांनी हेच केलं होतं," असं नारायणमूर्ती म्हणाले होते. त्यांनी पॉडकास्ट 'द रेकॉर्ड' साठी इंफोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्यांशी संवाद साधताना हा सल्ला दिला होता. 

नारायणमूर्ती यांच्या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी या सल्ल्याशी आपण अजिबात सहमत नसल्याचं सांगत टीका केली होती. एका युजरने म्हटलं होतं की, जर कॉलेजपासूनच 70 तास काम केलं तर यांच्या इंफोसिस कंपनीत जाण्याची गरज नाही. तर एका युजरने लिहिलं होतं की, घर आणि नोकरी अशा दोन्ही आघाडींवर असणाऱ्या महिलांना तर नोकरी सोडावी लागेल. तर एकाने त्यांना देशातील कित्येक तरुण 12 तासांच्या नोकरीव्यतिरिक्त रोज 3 तास प्रवास करतात त्याचाही विचार करा असं सांगितलं होतं. 

'...अन् तुम्ही इंग्लंड चालवता'

कॉमेडियन वीर दासने टीका करत म्हटलं होतं की, "आयुष्य किती कठीण आहे. तुम्ही एका मुलीला भेटता, प्रेम होतं, लग्न होतं आणि मुलीच्या वडिलांची इच्छा आहे की, तुम्ही 70 तास काम करावं. तुम्ही इतकी मेहनत घेऊ शकत नाही, तुम्हाला मजा करायची आहे आणि मग तुम्ही इंग्लंड चालवता". वीर दासने या ट्वीटमधून ऋषी सुनक यांच्यावर निशाणा साधला होता.

पुढे त्याने लिहिलं होतं की, "जर तुम्ही आठवड्यातील 5 दिवसात 70 तास काम करत असाल तर सकाळी 9 ते रात्रीचे 11 वाजतील. 12.30 वाजता तुम्हाला घऱी यावं लागेल आणि सकाळी 7.30 वाजता पुन्हा ऑफिसला जायचं? तुम्हाला तुमच्या बॉसच्या ऑफिसमध्ये पादण्याची परवानगी दिली पाहिजे. जर तुम्ही एखाद्या नात्यात वचनबद्दता अपेक्षित असेल तर मग थोडी इंटिमसीपण स्विकारावी लागेल".